लोकमत न्यूज नेटवर्क
खोडद : ‘विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरून भारताला वैज्ञानिक दृष्ट्या समृद्ध होण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडावी. कारण भारताला वैज्ञानिक दृष्ट्या सक्षम करण्याचे सामर्थ्य केवळ विद्यार्थ्यांमध्ये आहे. विद्यार्थ्यांनी समाजाच्या विविध समस्यांकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहून सहज व सुलभ उपाय शोधावेत जेणेकरून भारत विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे उद्दिष्ट साध्य करेल,’’ असे प्रतिपादन मुंबई येथील केंद्रीय अणुऊर्जा खात्याच्या संशोधन व विकास विभागाच्या संयुक्त सचिव सुषमा ताईशेटे यांनी केले.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त जीएमआरटीने आयोजित केलेल्या ऑनलाईन विज्ञान प्रदर्शनाचे ऑनलाईन उद्घाटन सुषमा ताईशेटे यांचे हस्ते रविवारी झाले. यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. ताईशेटे म्हणाल्या की, विज्ञानामध्ये आवड निर्माण होण्यासाठी सतत जागरूक राहून प्रश्न विचारावेत. का? कसे? कुठे? कधी? असे प्रश्न जरूर विचारावेत कारण याच प्रश्नचिकित्सांमुळे भारतातले थोर शास्त्रज्ञ सी.व्ही.रामन घडले व त्यांच्या रूपाने भारताला नोबेल पुरस्कार मिळाला. जीएमआरटीचा उपक्रम गौरवशाली असून या परिसरातील सर्व शिक्षक, विद्यार्थी व स्थानिक रहिवासी यांचा उत्स्फूर्त सहभाग व सहकार्य याचे कौतुक वाटते.
प्रास्ताविक एनसीआरएचे वरिष्ठ अधिकारी डॉ. जे. के. सोळंकी यांनी केले. जीएमआरटीचे कार्य कसे? चालते याविषयी ध्वनिचित्रफीत नव्याने दाखवली. हे प्रदर्शन १५ मार्चपर्यंत https://gmrtscienceday.ncra.tifr.res.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहायला मिळणार आहे. जीएमआरटी व विज्ञान शिक्षकांच्या वतीने या शालेय व महाविद्यालयीन प्रकल्पाचे परीक्षण करून पारितोषिक वितरण समारंभ घोषित केला जाणार आहे. एनसीआरएचे अधिष्ठाता प्रो.यशवंत गुप्ता यांनीही मनोगत व्यक्त केले. शोगतो चटर्जी यांनी आभार मानले.
चौकट
देशभरातील ९ राज्यांतील ३२९ शाळांमधील एकूण ८५० विद्यार्थ्यांनी या ऑनलाईन प्रदर्शनात सहभाग घेतला. एकूण ६४७ ऑनलाईन विविध प्रयोग व प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले होते.
५ वी ते ७ वीच्या गटांत २६६ प्रकल्प सादर केले होते. ८ वी ते १० वीच्या गटांत २९९ प्रकल्प सादर केले होते.१ १ वी, १२ वी आणि आयटीआयच्या गटांत ४५ प्रकल्प सादर केले होते. बीएससी आणि डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी २९ प्रकल्प सादर केले होते. बीईएमएससी गटांत ८ प्रकल्प सादर केले होते.
चौकट
महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, ओरिसा या राज्यांमधून अनेक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रदर्शनासाठी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
प्रा. दिव्य ओबेरॉय, संताजी काटोरे, श्रीराम मेमाणे, शिलकुमार मेश्राम, रत्नकुमार व अभिजित जोंधळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कोट
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित ऑनलाईन विज्ञान प्रदर्शनाला विद्यार्थ्यांकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल असे वाटले नव्हते. कोरोनाच्या निमित्ताने हे विज्ञान प्रदर्शन देशभर पोहोचले आहे, याचा विशेष आनंद आहे." - डॉ. जे. के. सोळंकी वरिष्ठ अधिकारी, एनसीआरए,
पुणे
कॅप्शन : विज्ञान दिनानिमित्त आयोजित ऑनलाईन प्रदर्शनात ऑनलाईन सादर केलेले प्रकल्प.