पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील परिसरात शैक्षणिक कामासाठी विद्यार्थ्यांसह नागरिक माेठ्या संख्येने येत असतात. विद्यापीठ परिसर सुमारे चारशे एकर मध्ये पसरलेला आले त्यामुळे अनेकांना पायी चालत कामाच्या ठिकाणी पाेहचावे लागते. दरम्यान, विद्यापीठ प्रशासनातर्फे विद्यापीठ परिसरात मोफत बस सेवा सुरू केली आहे. त्यामुळे शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि नागरिकांची पायपीट वाचणार आहे.
विद्यापीठ परिसरात स्वतःचे वाहन नसलेल्या विद्यार्थी, प्राध्यापक, सेवक आणि नागरिकांना पायी चालत जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवेसाठी विद्यापीठातर्फे दोन बसेस देण्यात आल्या आहेत. सकाळी १०.३० वाजता मुख्य प्रवेशद्वारापासून बस सेवा उपलब्ध केली आहे. विद्यापीठातील सर्व प्रमुख विभाग व कार्यालयासमोर जवळपास १३ बस थांबे दिले आहे. भविष्यात विद्यार्थी आणि नागरिकांचा प्रतिसाद बघता थांब्यांच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहे. तसेच ठिकठिकाणी यासंदर्भात फलकही लावण्यात येणार आहेत.
बसचे थांबे
विद्यापीठाचा मुख्य प्रवेशद्वार, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जयकर ज्ञानस्त्रोत केंद्र (जयकर ग्रंथालय), रसायनशास्त्र विभाग, परिक्षा विभाग, आंतरराष्ट्रीय केंद्र, मुख्य इमारत, तंत्रज्ञान विभाग, मुलींचे वसतीगृह, आरोग्य केंद्र, पुंबा, मुलांचे वसतीगृह, मुख्य प्रवेशद्वार.
बसचे वेळापत्रक
सकाळी १०.३० पासून दर अर्ध्या तासाला
बस सेवेमुळे विद्यार्थी, प्राध्यापक, सेवक आणि नागरिकांना निश्चित मदत होणार आहे. हा प्रवास अधिक सुलभ व्हावा यासाठी विद्यापीठातर्फे अॅप तयार केले जाणार आहे. ज्यामुळे बस नेमकी कुठे आहे, किती वेळात कोणत्या थांब्यावर पोहचेल यांची माहिती वापरकर्त्यांना मिळेल. - डॉ.सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ