आविष्कार स्पर्धेची प्रमुख उद्दिष्टे :
१. विद्यार्थ्यांमध्ये संशोधन संस्कृती रुजवणे.
२. नवनिर्मित व अकल्पित विचारांना प्रोत्साहन मिळणे.
३. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रतिभेस सादरीकरणासाठी संधी उपलब्ध करून देणे.
४. उद्योग, संशोधन व विकास संस्था आणि शैक्षणिक क्षेत्र यात विचारांच्या देवाण-घेवाणीस व संवादास चालना देणे.
-------------------------
स्पर्धा कोणत्या विभागांमध्ये घेतली जाते?
१. मूलभूत विज्ञान
२. वाणिज्य, व्यवस्थापन शास्त्र, लॉ
३. कृषि विज्ञान आणि पशु संवर्धन शास्त्र
४. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान
५. वैद्यकीय शास्त्र व औषधनिर्माण शास्त्र
६. मानव व विज्ञान भाषा शास्त्र
७. ललित कला.
-----------------
आविष्कार स्पर्धा प्रत्येक विभागात चार स्तरावर घेतली जाते. त्यात पदवीस्तर, पदव्युत्तर स्तर , संशोधन स्तर (एम. फिल. पी.एचडी.), शिक्षकस्तर या विभागांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यापीठातील विभाग व संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थी यांच्या सहभागातून संबंधित विद्यापीठाचा संघ निवडला जातो. या संघात वरील विभाग व स्तर याला अनुसरून कमाल ४८ विद्यार्थी सहभागी होतात. आविष्कार स्पर्धा दरवर्षी वेगवेगळ्या विद्यापीठात आयोजित केली जाते. या स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्वाधिक वेळा प्रथम क्रमांक मिळवून भरीव कामगिरी केली आहे.
आविष्कार स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्यास मदत होते. या स्पर्धेदरम्यान विषयतज्ज्ञ व इतर सहभागी विद्यार्थी यांच्याशी होणारा संवाद व तसेच तज्ज्ञांचे होणारे मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांच्या संशोधन विचार क्षमतेमध्ये सखोलता निर्माण होते. त्याचप्रमाणे स्वत:च्या कामावर विश्वास निर्माण होणे, व्यक्त होण्यास असणारी भीती नष्ट होणे व विचारांची मांडणी करण्यात सुसूत्रता निर्माण होणे, अशा अनेक गुणांमुळे व्यक्तिमत्त्व विकासात मदत होते.
विद्यार्थ्यांच्या मनातील सामजिक, आर्थिक, सांस्कृतिक व वैज्ञानिक विचार व्यवहारतेच्या पातळीवर तपासून पाहण्याची संधी आविष्कारमुळे निर्माण झालेल्या व्यासपीठामुळे मिळाली. प्रत्येक प्रदेशाची पर्यावरणीय स्थिती वेगळी असते. त्यामुळे कोणतीही एक समस्या घेतली तर तिचे स्वरूप व निराकरण स्थलकालानुरूप भिन्न असते. आविष्काराच्या माध्यमातून अशा समस्या निराकरणाच्या उपाययोजना सादर केल्या जातात. त्यांचा उपयोग नियोजन, धोरण निश्चितीमध्ये होऊ शकतो.
बहुतेक वेळा कोणताही संशोधावर आधारीत विचार एकांगी असण्याची शक्यता असते. तसा अनुभव आविष्कारमध्ये सादर केलेल्या संशोधन प्रकल्पात आढळतो. आविष्कारमुळे एखाद्या विषयाकडे विविधांगाने संशोधन करण्याची विद्यार्थ्यांना सवय लागते. त्यामुळे संशोधन विचार हा केवळ भावनिक न राहता व्यवहारिक पातळीवर विकसित होतो. संशोधन कार्याबरोबर त्याचे सादरीकरण व मांडणी प्रवाही होणे हे कौशल्य तेवढेच महत्त्वाचे आहे. स्पर्धेमुळे विद्याथर्यांंमध्ये अभिनव पद्धतीने पोस्टर बनविणे, आत्मविश्वासाने नेमक्या शब्दांत मांडणी करणे अशा संवादाच्या कौशल्य रुजविण्याचे काम अतिशय प्रभावी होते.
आविष्कार ही चळवळ संपूर्ण महाराष्ट्रभर केवळ विद्यापीठ स्तरावर न राहता शहरी, निम्नशहरी व तसेच दुर्गम भागातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचली आहे. त्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होत असून अपेक्षेप्रमाणे त्यांच्यातील संशोधन गुणांना विचारांना निश्चितच प्रेरणा मिळत आहे. त्यामुळे आविष्कार ही संशोधन चळवळ भक्कम करण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.
- डॉ. व्ही. बी. गायकवाड, व्यवस्थापन परिषद सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ