पुणे : पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी इंटरनेटसह टॅब खरेदी करण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मागील वर्षभरात शैक्षणिक कारणांसाठी करण्यात आलेली तरतूद खर्च झालेली नाही. ही रक्कम मुलांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी खर्च करण्याचा प्रस्ताव नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी दिला होता. या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.
पालिकेच्या शाळांमध्ये सुमारे एक लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंदच आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आळस. परंतु, गोरगरीब आणि कष्टकऱ्यांच्या मुलांकडे मोबाइल, लॅपटॉप, संगणक आणि इंटरनेटची सेवा उपलब्ध नसल्याने त्यांची मोठी गैरसोय झाली. यावर्षीसुद्धा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने ऑनलाइन शिक्षणाची व्यवस्था करावी लागणार आहे.
महापालिकेतर्फे दरवर्षी डीबीटी योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके, गणवेश, रेनकोट, बूट, स्वेटर आदी शालेय साहित्यासाठी बँकेत ठरावीक रक्कम हस्तांतरित करण्यात येते. गेल्या वर्षीच्या अंदाजपत्रकात ही तरतूद खर्ची पडली नाही. यावर्षीसुद्धा डीबीटीसाठी १७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. डीबीटीऐवजी या उपलब्ध तरतुदीतून चौथी ते आठवीच्या सुमारे ३८ हजार विद्यार्थ्यांसाठी इंटरनेटसह टॅब खरेदी करण्याचा प्रस्ताव धेंडे यांनी दिला होता. त्याला मान्यता देण्यात आल्याचे स्थायीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.