उमेश जाधव
शालेय विद्यार्थ्यांना हसत-खेळत, आनंदी वातावरणात शिक्षण घेता यावे. तसेच, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा यासाठी दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी जुलै २०१८ मध्ये दिल्लीतील आठ शाळांमध्ये हॅपीनेस अभ्यासक्रमाची सुरुवात केली. नर्सरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दररोज ४० मिनिटांच्या तासात हसत- खेळत, बुद्धीला चालना देणारे घेतले जाणारे हॅपीनेस तास आज जगभरात चर्चेचा विषय ठरले आहेत. महाराष्ट्र सरकारने दिल्लीच्या शिक्षण माॅडेलचे अनुकरण करत काही उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अद्याप त्यादृष्टीने कोणताही निर्णय घेतलेला दिसत नाही.
हॅपीनेस अभ्यासक्रमात नवनवीन संकल्पनांच्या माध्यमांतून आनंदी राहण्याचे शिक्षण दिले जाते. त्यात ध्यानधारणा, बुद्धीला चालना देणाऱ्या कथा, गाणी, कविता विद्यार्थ्यांना ऐकवल्या जातात. तसेच, खेळांच्या माध्यमातून मुलांमध्ये निर्णयक्षमता, बुद्धिमत्ता विकास, संघभावना हे गुण आणि नीतिमूल्ये रुजवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मुलांना भावनात्मकदृष्ट्या बळकट करणे हा या उपक्रमामागील मूळ उद्देश आहे. दिल्ली सरकारचा हा उपक्रम म्हणजे भारतातील शिक्षण क्षेत्रातील परिवर्तनाचे पहिले पाऊल मानले जात आहे.
हॅपीनेस क्लाससाठी दिल्ली सरकारने शिक्षक, मानसशास्त्रज्ञ, शिक्षण सल्लागार, स्वयंसेवक अशा ४० जणांना प्रशिक्षण दिले. महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर आणि जे. कृष्णमूर्ती या तीन विचारवंतांच्या तत्त्वज्ञानावर आधारित ही हॅपिनेस संकल्पना आहे. स्व तसेच कुटुंब, समाज व पऱ्यावरणाशी आपले असलेले नाते या संकल्पनांचाही समावेश हॅपीनेसमध्ये आहे.
२०२० मध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने देशभरात लाॅकडाऊन झाले. शाळा बंद झाल्या. कुटुंबीयांसह लहान मुले घरातच अडकून पडली. मानसिक संतुलन ढासळत असल्याचे प्रकार वाढले. दिल्लीत शिक्षण मंडळाने ऑनलाईन हॅपीनेस क्लास सुरू केले. या क्लासमुळे विद्यार्थ्यांसह पालकांनाही फायदा झाला. घरातील वातावरण आनंदी झाले. पालकांनीही हॅपीनेस क्लासच्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. देशात आंध्र प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांनी ‘हॅपीनेस’ उपक्रम शाळांमध्ये राबविला आहे. त्याचप्रमाणे नेपाळ, अफगाणिस्तान, संयुक्त अरब अमिराती या देशांनीही ‘हॅपीनेस’ची संकल्पना स्वीकारली. हाॅर्वर्ड विद्यापीठाने हॅपीनेस संकल्पनेवर सखोल अभ्यास केला असून नुकतीच या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. त्यामुळे ही संकल्पना केवळ दिल्लीपुरती मयार्र्दित नसून देशभरातील सर्वच राज्यांनी त्याचा अभ्यासक्रमात समावेश करणे गरजेचे आहे. कोरोनाकाळात ताणतणाव वाढत असून मानसिक संतुलन ढासळत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तसेच, आॅनलाईन वर्गात सहभागी होण्यासाठी सतत मोबाईल किंवा संगणकासमोर रहावे लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होऊ लागला आहे.
कोरोनामुळे देशभरातील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. मात्र, हॅपीनेस क्लासमुळे दिल्लीतील विद्यार्थ्यांना या तणावाचा सामना करण्याचे बळ मिळाले आहे. त्यामुळेच कोरोनाकाळात हा उपक्रम अत्यावश्यक ठरत आहे. महाराष्ट्रात बालवाडी, अंगणवाडीमध्ये मुलांना हसत-खेळत शिक्षणाचे धडे दिले जातात. मात्र, त्याचे रुपांतर उपक्रम, अभ्यासक्रमात केल्यास त्याचा परिणाम, प्रभाव आणखी वाढेल. २०१९ मध्ये महाराष्ट्राचे शिक्षण अधिकारी आणि मनीष सिसोदिया यांची बैठक झाली होती. या बैठकीत महाराष्ट्राने शिक्षणातील बदलासाठी ‘दिल्ली माॅडेल’ राबवण्याचा निश्चय केला होता. राज्य सरकारने तातडीने त्यादृष्टीने निर्णय घेण्याची आज खरी गरज आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही ‘हॅपीनेस’चे महत्त्व कळेल.