पुणे : विद्येचं माहेरघर म्हणवल्या जाणाऱ्या पुणे शहरातील नामांकीत फर्ग्युसन महाविद्यालयात सत्यनारायणाची महापूजा घालण्यात आल्याची घटना समोर आली. त्यामुळे शिक्षणालय असणाऱ्या वास्तूला देवालय बनवण्यात आल्याचा आक्षेप विद्यार्थी संघटनांकडून घेण्यात आला आहे. फर्ग्युसन महाविद्यालयाचे मुख्य कार्यालय असणाऱ्या इमारतीमध्ये ही महापूजा घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे एखाद्या मंदिरापूढे लावण्यात येणाऱ्या पाटीप्रमाणे इथे बोर्ड लावण्यात आला असून, सर्वांनी पूजेच्या तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असं लिहिण्यात आलं आहे.
देश- विदेशातील सर्व जाती धर्माचे विद्यार्थी फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेतात. विद्यालयात सर्व जाती-धर्म एक समान मानले जातात. शासनाच्या कुठल्याही संस्थेत धार्मिक कार्यक्रम करण्याची परवानगी नाही तसा अध्यादेश असताना फर्ग्युसनमध्ये घालण्यात आलेल्या महापूजेने कॉलेज प्रशासन धार्मिक रुढीचं उदात्तीकरण करत असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे. त्यामुळे प्राध्यापकांनी लेखी माफी मागावी यावर विद्यार्थी ठाम आहेत.
प्राचार्य रवींद्रसिंह परदेशी यांना या वादा विषयी विचारले असता ते म्हणाले की, अनेक वर्षांपासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून सत्यनारायणाची पूजेचे आयोजन केले जाते. आम्ही केवळ परंपरा पाळल्याचे स्पष्टीकरण या वादावर त्यांनी दिले. आंदोलनकर्ता विद्यार्थी कुलदीप आंबेकर म्हणाला की, महाविद्यालयामध्ये कोणत्याही एका धर्माचे उदात्तीकरण करणे हे चुकीचे असून तुम्ही सत्यनारायणाची पूजा केली तर आम्हाला बकरी ईद साजरी करण्याची परवानगी देणार का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. तर प्राचार्याना निलंबित करण्यात यावे अशी मागणी शिक्षणमंत्र्यांकडे करणार असल्याचे त्याने सांगितले.