- कमलाकर शेटे
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शुल्कवाढ लागू केली. मात्र, विद्यापीठ प्रशासनाने विविध अभ्यासक्रमांची प्रत्यक्ष शुल्कवाढ आणि प्रत्यक्षात आकारलेले शुल्क यामध्येच प्रचंड तफावत दिसून आली आहे. विशेष म्हणजे कुलगुरूंना प्रत्यक्ष शुल्कवाढीचे आकडे न देता कमी शुल्क असलेली चुकीची आकडेवारी देत त्यांच्या डाेळ्यातच धूळफेक करण्याचा प्रयत्न त्यांच्याच प्रशासनाने केला आहे. याप्रकरणी कुलगुरूंनी उच्चस्तरीय चाैकशी समिती नेमली आहे.
प्रशासनाच्या आणि विद्यार्थ्यांना आकारलेल्या शुल्कात खूपच तफावत आहे. शुल्कात वाढ झाल्यानंतर प्रशासनाच्या आकडेवारी पेक्षा विद्यार्थ्यांना जास्त रकमेचे चलन आकारण्यात आलेले आहे. विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीने कुलगुरू व प्रशासकीय अधिकारी यांना पुराव्यानिशी हा प्रकार दाखवून दिला. त्यामुळे प्रशासनच विद्यापीठ, कुलगुरूंसह आणि विद्यार्थ्यांना खोटी माहिती देऊन फसवत आहे की काय? असा प्रश्न विद्यार्थी उपस्थित करत आहेत. याबाबत कुलगुरूंनी गांभीर्याने दखल घेत आकडेवारी दुरुस्त करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मागण्यांबाबत अभ्यास करून अधिकार मंडळांसमोर योग्य प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. त्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती गठित करण्यात आली आहे.
पदव्युत्तर पदवी, डिप्लोमा, प्रमाणपत्र या सर्वच अभ्यासक्रमांची २८ फेब्रुवारी २०२० च्या आदेशानुसार शुल्कवाढ झाली आहे. विद्यार्थ्यांना आकारलेल्या चलनांमध्ये उपघटकांची संख्याही वाढविण्यात आली असून, त्याअंतर्गत विविध शुल्क आकारण्यात येत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शुल्कवाढ लागू करण्यास स्थगिती दिल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, २०२०-२१ मधील प्रवेशित विद्यार्थ्यांच्या चलनांमध्ये शुल्कवाढ लागू केल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर प्रत्येक वर्षी वाढ केली आहे, त्यामुळे सर्वच शुल्कवाढ रद्द करण्याची मागणी कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.