पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. केवळ राज्यातूनच नव्हे तर देशभरातून दररोज हजारोंच्या संख्येने येणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अस्वच्छतेला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार आता कायद्याचे शिक्षण घेणाºया तीन विद्यार्थ्यांनी स्थायी लोकअदालतीच्या माध्यमातून केली आहे. यात सेंट्रल रेल्वे, पुणे विभागाला रेल्वे स्थानकाच्या परिसरातील दुर्गंधी व अस्वच्छता विषयक समस्या मांडण्यात आल्या आहेत.
मराठवाडा मित्रमंडळाच्या शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयात शिकणाºया देवांगी तेलंग (वय २०), श्रुती टोपकर (२०) आणि निखिल जोगळेकर या विद्यार्थ्यांनी रेल्वे स्थानकाच्या समस्यांकडे लक्ष वेधले आहे. दर वेळी पुणे स्थानकाच्या स्वच्छतेबाबत प्रशासन काम करते; मात्र स्थानक परिसरातील स्वच्छता नियमित ठेवण्यात त्यांना अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. या सगळ्या परिस्थितीचा अभ्यास करून या तिन्ही विद्यार्थ्यांनी मिळून सप्टेंबर २०१८ मध्ये ज्येष्ठ विधिज्ञ व मानवी हक्क विश्लेषक अॅड. असीम सरोदे यांच्या मदतीने याचिका दाखल केली. यानंतर स्थायी लोकअदालतीचे न्यायाधीश सुधीर काळे आणि सदस्य रवीकुमार बिडकर, प्रमोद बनसोडे यांनी या प्रकरणावर ८ फेब्रुवारी रोजी काही सूचना केल्या. पुणे रेल्वे स्थानकातील स्वच्छतागृह कमालीची अस्वच्छ आहेत. त्यांची वेळेवर स्वच्छता केली जात नसल्याने मोठ्या दुर्गंधीला सामोरे जावे लागते. अनेक ठिकाणी स्वच्छतागृहांची तोडफोड झाल्याचे दिसून येते.
याबरोबरच स्वच्छतागृहांमध्ये दिव्यांची सोय नाही. त्याकरिता वायरिंगचे काम केले असून प्रत्यक्षात दिवेच नसल्याने अडचण आहे. विद्युत बोर्ड नादुरुस्त आहेत. मुळातच ज्या संख्येने स्वच्छतागृह उभारण्यात आली आहेत, त्यांची संख्या पुरेशी नसून जी आहेत ती बंद अवस्थेत असल्याचे विद्यार्थ्यांना आढळून आले आहे; तसेच ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय आहे, अशा जागी प्रवाशांनी कचरा टाकून अस्वच्छता केली आहे. रेल्वे मार्गावर, फलाटदेखील कमालीचा अस्वच्छ झाल्याचे याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांनी सांगितले.
संबंधित याचिका दाखल केल्यानंतर समितीचे अध्यक्ष काळे यांनी रेल्वे प्रशासनाला योग्य त्या सुविधा तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले आहे. प्रत्येक फलाटावर स्वच्छतागृहांची पुरेशी संख्या असणे, फलाटावर स्वच्छता ठेवणे, सातत्याने त्यात सुधारणा करीत राहणे, याबरोबरच रेल्वेमार्ग आणि रेल्वेमार्ग ओलांडण्याकरिता वापरात येणाºया रेल्वेपुलांवर देखील स्वच्छता ठेवण्याची सूचना त्यांनी केली आहे. यावर पुणे रेल्वे स्थानकाचे मुख्य स्वास्थ्य निरीक्षक नितीन शिंदे म्हणाले की, जे विद्यार्थी पुणे रेल्वे स्थानकाची पाहणी करण्याकरिता आले होते, त्यांना सर्व परिसर प्रत्यक्षात दाखविण्यात आला. सध्या अनेक ठिकाणी स्वच्छतागृहांची कामे सुरू आहेत. काही ठिकाणी कामे पूर्ण झाली आहेत. आता स्थानक परिसरात अस्वच्छता करणाºयांवर प्रशासन कडक कारवाई करीत आहे. रेल्वे स्थानकावर थुंकून घाण करणाºयांवर कडक कारवाई करण्यात येत असून विद्यार्थ्यांनीदेखील या कामाबाबत समाधान व्यक्त केले.विद्यार्थ्यांनी वकील होण्याची वाट न पाहता शिक्षण सुरू असताना समाजोपयोगी कामे करण्यावर भर द्यावा आणि कायदेविषयक सर्जनशीलता तयार व्हावी, या उद्देशातून स्थायी लोकअदालतीच्या माध्यमातून दाद मागण्यात येते. लोकांना पैसा खर्च न करता त्यांना न्याय मिळावा याकरिता त्यांचे प्रश्न मांडण्याची संधी विद्यार्थ्यांना दिली जाते. याबरोबरच समाजहिताच्या अनेक केस यानिमित्ताने अभ्यासता येत असून, त्याच्यातील बदलांकरिता कार्यरत राहणे गरजेचे आहे.- अॅड . असीम सरोदेमहाविद्यालयाच्या वतीने लीगल इन्टरव्हेंंशन नावाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला. यात सार्वजनिक प्रश्नांना केंद्रभूत मानून ते सोडविण्याकरिता मार्गदर्शन करण्यात आले. पीएमपी, सार्वजनिक रस्ता, पादचारी मार्ग आणि रेल्वे स्थानकावरील अस्वच्छता आदी समस्यांचा शोध आतापर्यंत विद्यार्थ्यांनी स्थायी लोकअदालतीत १० केस दाखल केल्या असून, त्यापैकी दोन केसेसला न्यायालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. तरुणांचा उत्साह आणि ऊर्जा याला बळ देण्याकरिता हा उपक्रम महत्त्वाचा आहे.- क्रांती देशमुख(प्राचार्य, शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय)