पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल परीक्षा ऑनलाइन पद्धतीनेच घेण्याचा निर्णय विद्यापीठाच्या अभ्यास मंडळामध्ये घेण्यात आला. मात्र, त्यासाठी बोर्ड ऑफ डीन व विद्या परिषदेची मान्यता घेतली जाणार आहे, असे विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. जी. चासकर यांनी गुरुवारी सांगितले.
कोरोनामुळे सुमारे वर्षभरापासून महाविद्यालय बंद आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रॅक्टिकल करता येत नाहीत. त्याचप्रमाणे महाविद्यालयांकडेसुद्धा उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाला मर्यादा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल परीक्षा कशा घ्याव्यात? असा मोठा प्रश्न निर्माण झाला. मात्र, गुरुवारी विज्ञान शाखेच्या सर्व विषयांच्या अभ्यास मंडळांच्या अध्यक्षांची बैठक घेण्यात आली. त्यात पहिल्या व दुसऱ्या सत्राच्या प्रत्येकी दहा ‘प्रॅक्टिकल्स’चे व्हिडीओ तयार करण्याचे निश्चित झाले. तसेच विद्यार्थ्यांचे पुढील दीड ते दोन महिन्यात ऑनलाइन पद्धतीनेच प्रात्यक्षिके घेऊन आणि त्यांचे मूल्यांकन करून गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला.
चासकर म्हणाले, सर्व विषयांच्या अभ्यास मंडळांकडून पुढील आठ दिवसांमध्ये प्रॅक्टिकलचे व्हिडिओ तयार केले जाणार आहेत. तसेच पंधरा दिवसांच्या आत सर्व व्हिडिओ महाविद्यालय व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. सध्या लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे पुढील दीड-दोन महिन्यांमध्ये महाविद्यालय सुरू होतील, असे वाटत नाही. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने प्रॅक्टिकल घेऊनच विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाणार आहे. त्यास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी पाठिंबा दिला आहे.