बारामती : ग्रामीण भागातील मुलांना कौशल्यावर आधारित शिक्षण त्यांच्याच परिसरात मिळावे, या उद्देशाने बारामती तालुक्यातील कृषी उद्योग मूल शिक्षण संस्थेने काऱ्हाटी येथे खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू केली आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेनुसार येथील प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. संस्थेचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयटीआयचे प्रशिक्षण सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
कृषी उद्योग मूल शिक्षण संस्था ही काऱ्हाटी, माळवाडी व ढाकाळे या गावांच्या हद्दीत कार्यरत संस्था आहे. जिरायती भागातील युवकांना त्यांच्या घराजवळच शिक्षणाची सुविधा यानिमित्ताने मिळणार आहे. काऱ्हाटी येथे आयटीआयची अत्यंत सुसज्ज इमारत पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. मागील बाजूस सुसज्ज कार्यशाळाही तयार करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षात वाढत्या औद्योगिकीकरणासोबतच कुशल मनुष्यबळाचीही मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली. त्यामुळे काळाची गरज ओळखून काऱ्हाटीसारख्या ग्रामीण भागात आयटीआय सुरु करण्याचा निर्णय झाला असल्याचे संस्थेचे सचिव प्रफुल्ल तावरे यांनी सांगितले. संस्थेत आयटीआयच्या दोनशेहून अधिक जागा आहेत. कुशल मनुष्यबळाची गरज भासणाऱ्या संस्थांसह काही परदेशी संस्थांमध्येही येथील मुलांना पाठविण्याचा मानस तावरे यांनी व्यक्त केला. याशिवाय याच संस्थेच्या वतीने गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचीही निर्मिती होणार आहे. या साठी प्रवेशप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. याशिवाय ग्रामीण भागातील खेळाडू घडविण्यासाठी संस्थेच्या वतीने भव्य क्रीडा संकुलाचीही निर्मिती केली जाणार आहे.
बारामती तालुक्यातील कृषी उद्योग मूल शिक्षण संस्थेने काऱ्हाटी येथे खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरु केली आहे.
१३०८२०२१ बारामती—०१