विद्यार्थी म्हणतात, 'ऑनलाईन शिक्षणाने आमच्या डोळ्यांना त्रास होतोय' पुण्यातील शाळा सुरु होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 02:23 PM2022-01-21T14:23:47+5:302022-01-21T14:24:03+5:30
कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे बंद करण्यात आलेल्या राज्यातील शाळा येत्या सोमवारपासून सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे
पुणे: कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे बंद करण्यात आलेल्या राज्यातील शाळा येत्या सोमवारपासून सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थी पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, ओनलाईन वर्गाला कंटाळलेले विदयार्थी ऑफलाईन वर्ग सुरु होत असल्याने आनंदात आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे दोन वर्षांपासून बंद असलेल्या शाळा रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर सुरू करण्यात आल्या. मात्र, आठ-पंधरा दिवस शाळा सुरू करून पुन्हा बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले. त्यातच इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या संस्थाचालकांनी शासन आदेश डावलून विद्यार्थी हितासाठी पालकांच्या संमतीने काही शाळा सुरू केल्या. शासनालाही या दृष्टिकोनातून विचार करणे भाग पडले. त्यामुळे येत्या सोमवारपासून पुन्हा शाळा सुरू होत आहेत.
ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा शिक्षकांसह विद्यार्थी व पालकांच्या लक्षात आले आहेत. तसेच गेल्या दोन वर्षांत शाळा बंद असल्यामुळे झालेले विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढणे गरजेचे आहे. सद्यपरिस्थितीत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी शाळा महाविद्यालय सोडून इतर सर्वत्र फिरत आहेत. परिणामी केवळ शाळेमध्ये आल्यानंतरच कोणाचा संसर्ग होतो का? असा सवाल उपस्थित केला जात होता. त्यामुळे राज्य शासनाने पुन्हा शाळा सुरू करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे स्वागत होत आहे.
''माझी मुलगी इयत्ता दहावीमध्ये असून तिचे ऑफलाइन वर्ग पुन्हा बंद करण्यात आले होते. इयत्ता दहावीचे वर्ष विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे असते. त्यामुळे ऑफलाइन शाळा सुरू होणे गरजेचे आहे. शाळा सुरू होत आहे, ही आनंदाची बाब पालक संध्या गुप्ता म्हणाल्या आहेत.''
''मोबाईलवर ऑनलाइन शिक्षण घेऊन व व्हिडिओ पाहून डोळ्यांना त्रास होत आहे. प्रत्यक्ष वर्गात बसून शिक्षण घेतल्यामुळे अवघड घटक शिक्षकांकडून चांगल्या पद्धतीने समजून घेता येतात. त्यामुळे प्रत्यक्ष वर्ग सुरू व्हावेत हीच विद्यार्थ्यांची मागणी होती असे विद्यार्थी स्नेहल सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.''
निर्णय कोरोना आढाव बैठकीत होणार
राज्य सरकारने राज्यातील सर्व शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी, पुण्यात वाढणारी रूग्ण संख्या विचारात घेता शहरातील शाळा सुरू करण्याबाबत घाई केली जाणार नाही़ शहरातील शाळा लागलीच सुरू न करण्याबाबत, पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कोरोना आढावा बैठकीत आग्रही भूमिका पालकांच्या वतीने मांडण्यात येणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.