पुणे : शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या विविध शिष्यवृत्तीसाठी डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून अर्ज स्वीकारले जात आहे. आतापर्यंत एस. सी. संवर्गातील राज्यातील ५ लाख ३५ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन पद्धतीने अर्ज जमा केले आहेत. त्यातील तब्बल ४८ हजार ५३८ विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत, तर राज्यातील एकूण १ लाख १७ हजार ५८० विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा केली आहे.
राज्याच्या समाजकल्याण विभागातर्फे आॅनलाईन पद्धतीने शिष्यवृत्ती अर्ज स्वीकारले जात होते. मात्र, गेल्या वर्षीपासून राज्य शासनाकडून केवळ डीबीटी पोर्टलवरून सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीचे अर्ज स्वीकारले जात आहेत; परंतु डीबीटी पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने राज्यातील सर्व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांकडून आॅफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची नामुष्की शासनावर आली.मात्र, चालू शैक्षणिक वर्षात डीबीटी पोर्टलवरून सुरळीतपणे शिष्यवृत्ती अर्ज स्वीकारले जात आहेत. शासनाकडूनआॅनलाईन पद्धतीने शिष्यवृत्ती अर्ज करण्यास २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे.
विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयात आवश्यक कागदपत्रे सादर केली जात नसल्याने विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयस्तरावर प्रलंबित आहेत. विद्यार्थ्यांकडून कागदपत्रे जमा केल्यानंतर महाविद्यालयांकडून शिष्यवृत्ती अर्ज आॅनलाईन पद्धतीने अॅप्रूव्ह केले जात आहेत.