पुणे : फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये (एफटीआयआय) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आधारित बीबीसीने तयार केलेल्या माहितीपटाचे सादरीकरण झाले. काही विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन हा माहितीपट पाहिल्याने त्याची चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एफटीआयआयमधील विद्यार्थी संघटनांकडून स्क्रीनिंग आयोजित केले होते.
गोध्रा हत्याकांड आणि दंगल यावर आधारित या माहितीपटामुळे जगभरातील सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे त्या माहितीपटावर बंदी घालण्यात आली आहे. बीबीसीने सोशल मीडियावर हा माहितीपट प्रसारित केला, त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. आता हा माहितीपट सोशल मीडियावरून हटवण्यात आला आहे. या माहितीपटावरून जगभर चर्चा सुरू झाली आहे. माहितीपट प्रसारित केल्यानंतर अनेकांनी तो डाउनलोड करून घेतला आहे. त्यामुळेच शुक्रवारी रात्री एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांनी त्याचे स्क्रीनिंग केले.
चौकशीबाबत माहिती नाही :
आम्ही प्रजासत्ताकदिनी मोदींवर आधारित माहितीपटाचे स्क्रीनिंग केले. या माहितीपटात नक्की काय आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. कुणीही संगीत, माहितीपट किंवा चित्रपटावर अशाप्रकारे बंदी घालू शकत नाही. एफटीआयआयमध्ये माहितीपटाचे स्क्रीनिंग केल्याबद्दल चौकशी सुरू असल्याबाबत कोणतीही माहिती नाही, असे स्टुडन्ट असोसिएशनच्या एका सदस्याने नाव न छापण्याच्या अटीवर लोकमतला सांगितले.