लोणावळा : देशाला प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाण्याचे सामर्थ्य शिक्षणात असल्याने विद्यार्थी मित्रांनो, खूप शिका व शिक्षणाचा चांगला उपयोग करा. असा सल्ला देताना समाजात स्त्री व पुरुषांना समान अधिकार शिक्षणातून मिळायला हवा, अशी अपेक्षा ज्येष्ठ अभिनेत्री माजी खासदार शबाना आझमी यांनी व्यक्त केली.लोणावळा नगर परिषदेच्या शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती तसेच महिला व बालकल्याण समिती आयोजित गुणवंत विद्यार्थी व मुख्याध्यापक पुरस्कार सोहळ्यात आझमी बोलत होत्या. या वेळी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती अर्पणा बुटाला, महिला व बालकल्याण समिती सभापती रचना सिनकर, उपसभापती जयश्री आहेर यांच्यासह नगरसदस्य उपस्थित होते. १० वी व १२ वीतील गुणवंत विद्यार्थी व मुख्याध्यापकांचा सत्कार केला.अध्यक्षीय भाषणात नगराध्यक्षा जाधव म्हणाल्या, बक्षिसांमुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते. याकरिता नगर परिषदेच्या वतीने मुलांना सव्वालाख रुपयांची रोख बक्षिसे वितरित करण्यात आली आहेत. दहावी ही मुलांच्या आयुष्याची पहिली पायरी आहे. त्यांचा पाया भक्कम करण्यासाठी पुढील काळात विविध मार्गदर्शकांची व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत. प्रतिभा दरेकर व चित्रा जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा चांगला उपयोग करावा: शबाना आझमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 3:21 AM