कोथरूड : मध्यरात्री तीनच्या सुमारास परिसरातील वीज गेली होती. अशा वेळेस एका मोटारीमधून आलेल्या दोन व्यक्ती आमच्या सोसायटीत राहत असलेल्या मुलींच्या खोलीत शिरल्या. त्या मोटारीवर पुणे महापालिका सभासद, प्रभाग क्र. ६७ अ असे स्टिकर लावले होते. खोलीतून आवाज येत होता. त्या आवाजाचा आम्हाला त्रास होत होता. हे काही आजचे नाही, दर शनिवारी असा गोंधळ असतो. पोलिसांकडे तक्रार करूनही कारवाई होत नसेल, तर आम्ही काय करावे, असा सवाल मौर्य सोसायटीमधील रहिवासी संतापाने करीत होते. एक ज्येष्ठ नागरिक म्हणाले, ‘‘येथील कॉलेज परिसरात तरुण मुले-मुली खुशाल सिगारेटचा धूर सोडत असतात. रात्री-अपरात्री त्यांचा धिंगाणा सुरू असतो. रोजच्या या त्रासातून मुक्तता मिळावी, म्हणून अनेकदा तक्रारी केल्या. परंतु त्याचा काहीही उपयोग होत नाही. पोलीस आल्यावर मुले थोडा वेळ पांगतात. पोलीस गेले, की पुन्हा तोच त्रास आम्हा ज्येष्ठ नागरिकांना तर रस्त्याने चालणे अवघड झाले आहे. यांच्या गाड्या कधी अंगावर येतील, हे सांगता येणार नाही. मौर्य विहार सोसायटीचे चेअरमन प्रदीप गावडे म्हणाले, की विद्यार्थ्यांना भाड्याने ठेवू नये, असा ठराव सोसायटीने केला आहे. तरीसुद्धा सोसायटीची परवानगी न घेता, पोलिसांना भाडेकरूंची माहिती न देता विद्यार्थी ठेवले जातात. अशा वेळी जर काही गैरप्रकार झाला, तर संबंधितांविरुद्ध पोलिसांनी कडक कारवाई करणे गरजेचे आहे. पोलीस उपनिरीक्षक शशिकांत देडगे म्हणाले, की भाडेकरुंची माहिती पोलीस ठाण्याला देणे बंधनकारक आहे. तसे केले नसल्यास घरमालकांवर कारवाई होऊ शकते. मौर्य सोसायटीतील रहिवाशांनी आमच्याकडे दिलेल्या तक्रारीनुसार संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. (वार्ताहर)
विद्यार्थ्यांचा गोंगाट; नागरिक त्रस्त
By admin | Published: March 20, 2017 4:39 AM