लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या काही वर्षांपासून आयटीआय प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा वाढलेला कल यंदा कमी झाल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शैक्षणिक संस्थांमध्ये जाऊन मार्गदर्शन घेणे व प्रशिक्षण करणे शक्य होत नाही. परिणामी विद्यार्थ्यांना सध्या ऑनलाईन पद्धतीनेच शिक्षण घ्यावे लागत आहे. त्यामुळे आयटीआय अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली असावी, अशी शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आयटीआयच्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. त्यामुळे आयटीआय अंतर्गत शिकवल्या जाणाऱ्या काही ठरावीक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे दिसून आले. परंतु, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आयटीआय प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षी राज्यातील तब्बल ३ लाख ३२ हजार १२८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. तर यंदा २ लाख १७ हजार विद्यार्थ्यांनीच अर्ज केले आहेत.
------------------------------
मागील वर्षी पुणे जिल्ह्यातील ११ हजार ५५२ जागांसाठी १५ हजार ८६५ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. परिणामी अर्ज केलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार प्रवेश मिळू शकला नाही. मात्र, यावर्षी ११ हजार २०० विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली असून, त्यातील केवळ १० हजार ८८० विद्यार्थ्यांनीच अर्ज कन्फर्म केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आयटीआयच्या उपलब्ध प्रवेश क्षमतेच्या तुलनेत अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्या कमी आहे.
-----------------
आयटीआयच्या विद्यार्थ्यांना वाढल्या औद्योगिकरणामुळे रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. तसेच कोणतेही कौशल्य प्राप्त केलास विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराच्या संधीसुद्धा प्राप्त होतात. आयटीआय प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटणे ही गंभीर आणि चिंतेची बाब आहे. विद्यार्थ्यांना या क्षेत्राची माहिती करून देणे गरजेचे आहे.
- डॉ. गोविंद नांदेडे, शिक्षणतज्ज्ञ
-------------------------
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संंचालनालयातर्फे आयटीआय प्रवेशाबाबत प्रवेश प्रोत्साहन अभियान राबविले जात आहे. काही दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे शक्य होत नाही, अशा विद्यार्थ्यांचे ऑफलाईन अर्ज भरून घेतले जात आहेत. मात्र, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे.
- योगेश पाटील, सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय
----------------------------
पुणे एकूण किती जागा उपलब्ध : ११,५५२
आतापर्यंत किती अर्ज आले : १०,८८०
जिल्ह्यातील शासकीय संस्था : ६१
जागा : ५,४६८
खासगी संख्या : १३८
जागा : ६,०८४
------------------