पुणे: मुळशी तालुक्यातील संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना कासारसाई येथे ऊसतोडणी कामगाराच्या दोन अल्पवयीन मुलींवर चार नराधमांनी लैंगिक अत्याचार केला. त्यात एका मुलीचा मृत्यू झाला.या घटनेच्या निषेधार्थ पुणे शहरात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या सुमारे दीड ते दोन हजार विद्यार्थ्यांनी कँडल मार्च काढला.
पुन्हा एकदा कोपर्डीच्या घटनेची पुनरावृत्ती झाली असून महाराष्ट्र हादरून गेला आहे.त्यामुळे खरच महाराष्ट्रातील महिला सुरक्षित आहेत काय?,अत्याचारग्रस्त ऊसतोड कामगारांच्या मुलींना न्याय मिळेल का?, कुठे आहे ,बेटी बचाओ बेटी पढाओ योजना,असा सवाल उपस्थित करत विद्यार्थ्यांनी नदी पात्रातील भिडे पूलापासून केळकर रस्त्या व अप्पा बळवंत चौकातून शनिवारवाड्यापर्यंत कँडल मार्च काढला. त्याचप्रमाणे कासारसाई खटला फास्ट टॅक कोर्टामध्ये चालवून आरोपींना सहा महिन्याच्या आत फाशीची शिक्षा देण्यात यावी.अत्याचार ग्रस्त मुलीच्या शिक्षणाची व ऊसतोड कुटुंबियांची पुनर्वसनाची जबाबदारी महाराष्ट्र शासनाने घ्यावी. कासारसाई खटला चालविण्यासाठी विशेष सरकारी वकिल म्हणून अॅड.उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी.अत्याचाग्रस्त कुटुंबाला शासनाने तात्काळ आर्थिक सहकार्य करावे.ऊसतोड मजुरांच्या सुरक्षेकडे व त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शासनाने विशेष लक्ष द्यावे,आदी मागण्या यावेळी विद्यार्थ्यांनी केल्या.तसेच मृत मुलीच्या आत्म्यास श्रध्दांजली अर्पण केली.