पुणे : ज्या शाळांची मान्यता रद्द झाली व शाळा बंद पडल्या त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे इतर शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार आहे. त्यातील ज्या विद्यार्थ्यांना आई किंवा वडील नसलीत अशा विद्यार्थ्यांना शाळेत जाता यावे, यासाठी प्रवासखर्च म्हणून दरमहा सहाशे रुपये याप्रमाणे दहा महिन्याचे सहा हजार रुपये एकरकमी त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.
वीसपेक्षा कमी पट असलेल्या शाळांची मान्यता रद्द करून त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे इतर शाळांमध्ये समायोजन करण्याचा नियम आहे. त्यानुसार राज्यात अशा विद्यार्थ्यांची संख्या निश्चित केली असून त्यातील आई किंवा वडील नसलेले विद्यार्थी किंवा त्यांच्या सोबत न राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्गीकरण करण्यात येणार आहे. त्या विद्यार्थ्यांना शाळेत जाताना प्रवास खर्चाची अडचण येऊ नये यासाठी त्यांना दरमहा सहाशे रुपये देण्यात येणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांचे आधार सोबत लिंक असलेल्या बँक खात्याची माहिती अपडेट करण्यात येणार असून ही माहिती डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येऊन जानेवारीमध्ये विद्यार्थ्यांना निधी वाटप करण्याचे आदेश शालेय शिक्षण मंत्र्यांकडून देण्यात आले आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थी अधिक
ग्रामीण भागातील प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या १५,०८८ विद्यार्थ्यांसाठी ९ कोटी ५ लाख ८८ हजार इतका निधी, तर शहरातील ३,८७४ विद्यार्थ्यांसाठी २ कोटी ३२ लाख ७४ हजार रुपयांचा निधी आणि माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या ७४४ विद्यार्थ्यांसाठी ४४ लाख ६४ हजार रुपयांचा निधी शालेय व क्रीडा शिक्षण विभागाच्या वतीने मंजूर केला आहे. हा निधी २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील मुलांसाठी मंजूर करण्यात आल्याचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे.