लोकमत न्यूज नेटवर्कनारायणगाव : जेईई व नीट परीक्षा पूर्वतयारीसाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरातील खासगी क्लासेसमध्ये प्रवेश घ्यावा लागत होता. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जेईई व नीट विषय समजण्यासाठी बराच कालावधी जात असे़ विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मेडिकल, इंजिनिअरिंग व इतर क्षेत्रांत सहज प्रवेश मिळावा. या परीक्षेची भीती व दडपण कमी व्हावे, यासाठी नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाने इ़ ११ वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांना जेईई व नीट परीक्षेच्या ऐच्छिक विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी पाच तज्ज्ञ उपलब्ध करण्यात येणार आहेत.विद्यालयातच दोन वर्षे या अभ्यासक्रमावर मार्गदर्शन होणार असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे़ माहिती ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्याध्यक्ष अनिलतात्या मेहेर, कार्यवाह रवींद्र पारगावकर यांनी दिली.ग्रामोन्नती मंडळ संचलित गुरुवर्य रा़ प़ सबनीस कनिष्ठ विद्यालयातील इ़ ११ वी, १२ वी विज्ञान शाखेतील मुलांसाठी जेईई व नीट परीक्षेचे मार्गदर्शन करण्यासाठी कोटा येथील पाच तज्ज्ञ मार्गदर्शक पीसीएमबी निवासी राहून सलग दोन वर्षे नियमित मार्गदर्शन करणार आहेत़ तसा करार कोटा येथील संस्थेशी करण्यात आलेला आहे़ नारायणगाव परिसरात आतापर्यंत अशी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे पालक लाखो रुपये खर्च करून आपल्या पाल्याला पुणे, मुंबई, कोटासारख्या ठिकाणी पाठवित असे़ त्यामध्ये कुटुंबापासून दूर गेलेल्या विद्यार्थ्यांचा श्रम व पैसा खर्च होत असे़ दोन महिन्यांच्या कालावधीच्या असणाऱ्या जेईई व नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगी क्लासेसला लाखो रुपये मोजावे लागत होते. सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमाबरोबरच एचएससी बोर्डाचा अभ्यासक्रमही पूर्ण केला जाणार आहे़ त्याचप्रमाणे मेडिकल प्रवेशासाठी नीट परीक्षा आणि इंजिनिअरिंग प्रवेशासाठी जेईई परीक्षा अशा दोन्हीचे मार्गदर्शन एकाच ठिकाणी होणार आहे़ याची नारायणगाव परिसरातील पालकांना व विद्यार्थ्यांना ही सुवर्णसंधी मंडळाने उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत शेवाळे व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र वाघोले यांनी दिली़ ग्रामोन्नती मंडळाच्या वसंत व्हिला सभागृहात झालेल्या मार्गदर्शन शिबिरात जेईई व नीट परीक्षा पूर्वतयारी या विषयावर पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली़ या वेळी ग्रामोन्नती मंडळाचे संचालक व सुमारे ३५० पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते़ (वार्ताहर)
ग्रामीण विद्यार्थ्यांना मिळणार जेईई,नीटचे धडे
By admin | Published: May 09, 2017 3:22 AM