पुणे : एखाद्या गाेष्ट अापल्याला मनापासून हवी असेल तर ती अापल्याला नक्कीच मिळते असे म्हंटले जाते. हेच वाक्य पुण्याच्या 12 वर्षीय रुद्रेश गाैडनाैर बाबत खरे ठरले अाहे. रुद्रेशला लहानपणीपासूनच फुटबाॅलची अावड हाेती. लहानपणापासूनच ज्या फुटबाॅल खेळाडूंना ताे टिव्हीवर पाहत हाेता, त्यांना अाता प्रत्यक्ष भेटण्याची संधी त्याला मिळणार अाहे. रुद्रेशची जागतिक फुटबाॅल फाॅर फ्रेंडशीप या सामाजिक उपक्रमात बालवार्ताहर म्हणून भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी निवड झाली अाहे. तरुणांमध्ये फुटबाॅलचा विकास व्हावा, त्यांनी अाराेग्यदायी जीवनशैलीचा अंगीकार करावा, त्याचप्रमाणे सहिष्णुता, खुली विचारसरणी अाणि जगभरातील विविध संस्कृती तरुणांना माहित व्हावी यासाठी फुटबाॅल फाॅर फ्रेंडशीप हा उपक्रम राबविला जाताे. या उपक्रमाला गॅझप्राॅम अाणि फिफातर्फे उपक्रमाला पाठिंबा देण्यात अाला अाहे. हा उपक्रम यंदा 211 देश अाणि प्रदेशांत विस्तारला अाहे. या उपक्रमात सहभागी हाेण्याचे भारताचे दुसरे वर्ष अाहे. रशियातील माॅस्काे येथे जून 2018 मध्ये रुद्रेश जगभरातून अालेल्या तरुण पत्रकारांना भेटणार अाहे. यावेळी ताे इंटरनॅशनल चिन्ड्रन्स प्रेस सेंटरचा भाग म्हणून फुटबाॅल फाॅर फ्रेंडशीप कार्यक्रमाच्या सर्व स्थानिक अाणि जागतिक स्तरावरील उपक्रमांचे वार्तांकन करणार अाहे. त्याचबराेबर उपक्रमाच्या नऊ मूल्यांबाबत जागरुकता वाढवण्याचेही काम करणार अाहे. रुद्रेशच्या घरची परिस्थीती तशी बेताचीच अाहे. त्याचे वडील भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. अापला मुलगा रशियाला जाणार हे कळाल्यावर त्यांना खूप अानंद झाला. रुद्रेश पुण्यातील पंडित दीनदयाळ उपाध्याय या महापालिकेच्या शाळेत अाठवी इयत्तेचा विद्यार्थी अाहे. त्याने वयाच्या अाठव्या वर्षापासून फुटबाॅल खेळायला सुरुवात केली. त्याचे प्रशिक्षक विष्णुसर यांच्यामाध्यमातून त्याला या उपक्रमाबाबत माहिती मिळाली हाेती. त्याने फुटबाॅल या खेळाबद्दल लिहिलेल्या निबंधामुळे त्याची या उपक्रमासाठी निवड झाली अाहे. रुद्रेश साेबतच बंगळुरु येथील 12 वर्षीय सूर्या वरिकुटी याची भारतातर्फे तरुण फुटबाॅलपटू म्हणून निवड झाली अाहे. भारतातर्फे सहभागी झालेले हे दाेघेही फिफा विश्वचषक 2018 स्पर्धेचा उद्घाटन साेहळा अाणि पहिला सामनाही पाहणार अाहेत. रुद्रेशच्या या यशात त्याचे प्रशिक्षक अजयसर, विष्णुसर अाणि त्याचा काेथरुड व्हाेल्वज या संघाचा माेठा वाटा अाहे.
पुण्याचा रुद्रेश गाैडनाैरची रशियामध्ये बालवार्ताहर म्हणून भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 8:35 PM