पुणे : इंग्रजी जगातली प्रमुख संवादभाषा असल्याने एक विषय म्हणून तिचा अभ्यास आवश्यक आहे. मात्र, इतर सर्व विषयांचे ज्ञान मातृभाषेतून देणे गरजेचे आहे. तरच विद्यार्थ्यांना त्या विषयाचा गाभा अधिक समजताे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी नेमण्यात आलेल्या चार समित्यांचे अहवाल प्राप्त झाले असून, लवकरच त्याबाबतची अंमलबजावणी केली जाईल, असेही पाटील म्हणाले. पुणे एज्युकेशन फोरमतर्फे ‘उच्च शिक्षणातील बदलते प्रवाह-संधी आणि आव्हाने’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते.
पाटील म्हणाले, राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी संशोधन, काैशल्य विकासाला चालना देणारे अभ्यासक्रम राबवावे. त्यासाठी प्रत्येक संस्थेत एक का हाेईना काैशल्यविषयक अभ्यासक्रम हवा. त्यासाठी पुण्यात एक शैक्षणिक कॅम्पस विकसित करण्यात येईल. ज्यात केवळ संशाेधनाला प्राधान्य असेल. यापुढील काळात बहुशाखीय आणि वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम यांना परवानगी व अनुदानही देऊ. सायन्स व आर्ट्ससाठी परवानगीच देणार नाही.
डॉ. माशेलकर म्हणाले की, शिक्षण व भविष्य हे अविभाज्य भाग आहे. नव्या पिढीचा बौद्धिक स्तर लक्षात घेऊन शिक्षक घडवावा लागणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात जागतिक स्तरावर अग्रेसर होण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून सर्वांनी कार्य करावे.