पहिली म्हणजे हातात नसलेल्या गोष्टींचा विचार न करणे. परीक्षा कधी होतील, त्या कशा होतील, सध्याची ही परिस्थिती केव्हा बदलेल याचा विचार न करणे, कारण या गोष्टी कोणाच्याच हातात नाही. त्यामुळे त्याचा विचार करून काहीच फायदा होणार नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे- जे आपल्या हातात आहे, जे आपण करू शकतो त्यावर लक्ष केंद्रित करणे. मुळात एखादी गोष्ट का करत नाही यासाठी आपण ‘संरक्षण यंत्रणेचा’ वापर करत असतो. तसेच, त्याबाबत समोरच्याला पटणारी कारणे देत असतो. कोरोनाची परिस्थिती नसतानाही परीक्षेच्या वेळी, पेपर खूप अवघड काढला, शिक्षकांनी हा पॉईंट शिकवलाच नाही, माझी तब्येत बरी नव्हती, अशी अनेक कारणे सर्व जण सांगत असतात. यावर्षी सगळ्यांना सामूहिक कारण मिळणार आहे, ते म्हणजे कोरोनाची परिस्थिती. प्रथमतः विद्यार्थ्यांमध्ये जो ‘लर्निंग हेल्पलेसनेस’ आला आहे तो त्यांनी सोडून द्यावा. आपला अभ्यास सुरू ठेवा. कारण परीक्षा या आयुष्यात पुढे जाण्यासाठी पायरीसारख्या असतात. जरी परीक्षा नाही झाल्या, तरी आपल्याला पुढे जायचे आहे. त्यामुळे आत्ता केलेल्या अभ्यासाचा उपयोग आपल्याला पुढील पायरीवर नक्कीच होणार आहे.
सध्याच्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी विद्यार्थ्यांसह सर्वांनीच नियमांचे पालन करणे,शरीर स्वास्थ्याची जपणूक करणे आणि मानसिक व भावनिक स्वास्थ्याची जपणूक करणे या त्रिसूत्रीचा वापर करावा. कारणाशिवाय घराबाहेर न पडणे, मास्कचा वापर करणे, सुरक्षित अंतर राखणे महत्त्वाचे आहे.
शरीर स्वास्थ्याची जपणूक करण्यासाठी आहार, दिनचर्या व व्यायाम या तीन गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांचा रोजच्या जेवणात समावेश करणे. आपली दिनचर्या व्यवस्थित ठेवणे. आहार आणि दिनचर्येच्या जोडीने व्यायाम देखील करणे आवश्यक आहे. ‘शरीर चांगले तर मन चांगले’ या उक्तीनुसार तब्येत चांगली राखली तर आपण कशालाही तोंड देऊ शकतो.
भावनिक व मानसिक स्वास्थ्यासाठी सकारात्मकता ठेवणे महत्त्वाचे. म्हणजेच कधी ना कधी हे संपणार आहे. ही आशा व मी यातून सुखरूप बाहेर पडणार आहे. याविषयीचा आत्मविश्वास ठेवणे आवश्यक आहे.
आपण जेव्हा समाजात राहतो तेव्हा समाजाचा आपल्यावर पडणारा प्रभाव आपण टाळू शकत नाही. संसर्गाने शारीरिक रोगच नाहीत तर मानसिक रोग देखील पसरतात. स्वतःला या नकारात्मक विचारांपासून दूर जायचे असेल तर ‘सेव्हर्स’ (SAVERS) बना.
S – Silence (ध्यान करा)
A – Affirmation (सकारात्मक स्वयंसूचना द्या)
V- Visualization (सगळे छान होत आहे अशी कल्पना करा)
E – Exercise (शारीरिक तंदुरुस्तीसाठी व्यायाम करा)
R – Reading (फक्त आणि फक्त सकारात्मकच वाचा)
S – Scribing (सकारात्मक लेखन करा)
नकारात्मक विचार मनात येऊ लागले तर त्यावर श्वासांचे व्यायाम करणे खूप उपयुक्त ठरते. नकारात्मक विचारांमुळे होणारे भावनिक स्वास्थ्याचे नुकसान कमी व्हायला मदत होईल.
एखादी वस्तू इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून खाली पडली तर तिचे जेवढे नुकसान होईल, त्यापेक्षा नक्कीच कमी नुकसान ती वस्तू वरून खाली पडतानामध्ये थोडा थोडा वेळ थांबत खाली आली तर होईल. तसेच, नकारात्मक विचारांना मध्येच श्वासाकडे लक्ष केंद्रित केल्याने ब्रेक मिळेल. त्यामुळे भावनिक स्वास्थ्याचे कमी नुकसान होईल.
सध्याच्या परिस्थितीत कुठेच बाहेर जायचे नाही, हॉटेलिंग करायचे नाही, कार्यक्रमांना जायचे नाही, नातलगांकडे जायचे नाही. त्यामुळे प्रत्येकालाच एक ‘रिकामेपण’ आले आहे. पण, विद्यार्थ्यांसाठी एक मात्र चांगले आहे की, त्यांच्यासमोर जे रिकामेपण आहे त्यात त्यांना काय भरायचे हे नक्की माहिती आहे. आता फक्त ते कसे भरायचे हे शिकावे लागेल. मुळात आपल्या समोर काहीतरी ध्येय हवे. मग, ते ध्येय साध्य करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केल्यास यश नक्कीच तुमचे असेल.
- प्रा.नीलिमा पुराणिक (समुपदेशक)
माेबाईल केवळ अभ्यासासाठीच वापरा
कोरोनाच्या परिस्थितीचा भावनिकतेवर खूप जास्त परिणाम होत आहे. अनेकांच्या मनात भीती, काळजी, दुःख अशा भावना निर्माण होत आहेत. अशावेळी सर्वप्रथम या भावनांना मोकळी वाट करून देणे गरजेचे असते. आपल्याला जाणवणाऱ्या भावना कोणाशी तरी बोलून टाकल्या तर भावनिक कोंडमारा कमी होऊ शकतो. बरेचदा नकारात्मक भावनांकडे दुर्लक्ष करण्यासाठी मोबाईल, टीव्ही यांचा अतिरिक्त वापर केला जातो. परंतु, हे तर इलाजापेक्षा उपाय भयंकर असे झाले. म्हणूनच मोबाईल, टॅब यांचा उपयोग केवळ अभ्यासासाठी करावा.