पुणे : घरची परिस्थिती बेताची. दोन मुली आणि एक मुलगा... त्यांना शिकवण्यासाठी हाताला मिळेल ते काम केले, मोलमजुरी केली, पोटाला चिमटे काढले, पण मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवले नाही. शिकण्यासाठी नेहमी पाठबळ दिल्यानेच माझा मुलगा रवींद्र उपजिल्हाधिकारी बनू शकला. त्यासाठी त्याने मोठी मेहनत घेतली, असे सर्वात तरुण वयात उपजिल्हाधिकारी बनलेल्या रवींद्र राठोडचे वडील शंकर राठोड यांनी सांगितले. शंकर राठोड यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले. त्यानंतर घरची जबाबदारी पडल्याने आणि स्थिती बेताची असल्याने त्यांना पुढील शिक्षण घेता आले नाही. कुटुंबाकडे अडीच एकर कोरडवाहू शेती असून, पाऊस पडला, तरच धान्य पिकते. अनियमित पावसामुळे अनेकदा शेतातून काहीच मिळत नसे. त्यामुळे शंकर राठोड हे हाताला मिळेल ते काम करीत. या आर्थिक विवंचेनेचे चटके त्यांनी कधी आपल्या मुलांना बसू दिले नाही. ते म्हणाले, ‘घरची आर्थिक स्थिती बरी नव्हती, पण कधी व्यसनाच्या आहारी गेलो नाही. आपले शिक्षण कमी झाले, पण मुलांना चांगले शिक्षण द्यायचे, या उद्देशाने मिळेल ते काम करीत गेलो. कारखान्यांमध्ये रोजंदारीवर कामे केली. ते काम नसताना मोलमजुरी केली. मुलांना नेहमी सांगत आलो की, चांगले शिक्षण घेतले, तरच तुम्ही चांगले व्यक्ती बनाल. यामुळे लहानपणापासूनच त्यांना शिक्षणाची गोडी लागली. मुलाला व दोन्ही मुलींना शिक्षणासाठी शहरांमध्ये पाठविले. अजूनही त्यांना शिकण्यासाठी मी मदत करतो. आज रवींद्र उपजिल्हाधिकारी झाला, यामुळे कष्टाचे चीज झाल्याचे समाधान मिळाले.’ (प्रतिनिधी)
मोलमजुरी करून मुलाला बनविले उपजिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2016 2:52 AM