शिक्रापूर : एका पोलिस उपनिरीक्षकाने होमगार्डाच्या मदतीने मलठण फाट्यावर एका टॅंकर चालकाकडून तब्बल अडीच लाखांची खंडणी वसूल करून लुटल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी खेडचे विभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महेंद्र गरूड (चव्हाणवाडी, करडे, ता. शिरूर) हे क्लिनर ज्ञानेश्वर माळी यांच्यासमवेत डिझेलचा टॅँकर घेऊन कोरेगाव भीमा येथील सेको कंपनीत जात होते. लोणी काळभोर येथून नगर-पुणे रस्त्याने डिग्रजवाडी फाट्याच्या पुढे त्यांच्या पाठीमागून लाल रंगाची मोटार आली. ती टॅकरला आडवी लावून टॅंकर थांबविण्यास भाग पाडले. त्यातून एक व्यक्ती खाली उतरला. त्याने चालक गरूड यांना आपण पोलीस असल्याचे सांगत टॅंकरचालकाला कारमधील मोठ्या साहेबांकडे येण्यास सांगितले. तसेच टॅंकर पोलिस ठाण्यात घेण्यास सांगितले. टॅंकरचालकाने त्याला विचारले मात्र, त्याने नाव सांगण्यास नकार दिला. त्यानंतर हा टॅँकर सणसवाडी हद्द्तील कल्पेश वे ब्रिजवर आणून त्याचे वजन केले आणि मोकळ्या मैदानात उभा करण्यास सांगितले.
टॅंकरचालकाला कारमध्ये बसवून टॅँकरमालक व त्यांचे मेहुणे दिगंबर जालिंदर शितोळे यांना व्हॉटस्अप कॉल करून पाच लाख रूपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास गुन्हा नोंदविण्याची धमकी दिली. तसेच टॅँकर पोलिस ठाण्यात घ्यायला सांगून दोन ते तीन ठिकाणी सुमारे ३० ते ४० किलोमीटर फिरवून शिक्रापूर-चाकण रस्त्यावरील हायवे किंग पेट्रोल पंपावर लावण्यास सांगितला. त्यानंतर तोतया पोलिस अधिका-याच्या कारमध्ये टॅंकरचालकाला बसविले व मलठण फाट्यावरील संजिवनी हॉस्पिटलजवळ आणले. तेथे टॅँकरमालक शितोळे यांच्याकडून अडीच लाख रूपये उकळले. याबाबत कुणाला सांगितल्यास खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची आणि टॅँकर कसा चालतो, अशी धमकी दिली.
पोलिस अधिक्षकांकडेच थेट तक्रार
या तोतया पोलिसाच्या धमकीमुळे चालक गरुड हे दहशतीत होते. मात्र, त्यानंतर गरूड यांनी थेट पोलीस अधिक्षक कार्यालय गाठत पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांची भेट घेतली. सोमवारी (दि १४) त्यांच्याकडेच अपहरण आणि खंडणीची तक्रार देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
दोषींवर कडक कारवाई करणार
''एका टॅकर चालकाने आपल्याकडे या प्रकरणी प्रत्यक्ष भेटून तक्रार केली आहे. हे प्रकरण गंभीर असल्याने खेड विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांना तातडीने तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्राथमिक तपासात या प्रकरणात एक पोलिस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी व होमगार्ड असल्याचे निष्पन्न झाले आहे. चौकशी नंतर दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सांगितले.''