पुणे : मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेल्या ध्वनिवर्धकावर कारवाई करणाऱ्या टोळक्याने गस्त घालणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकाला धक्काबुक्की केल्याची घटना खडकीतील मुळा रस्ता परिसरात घडली. या प्रकरणी खडकी पोलिसांनी पाचजणांना अटक केली.
सुमित सुभाष मिश्रा (वय २०), रसल एल्विस जाॅर्ज (२७), ऋषभ अशोक पिल्ले, निशांत संजय गायकवाड (२३), सिद्धार्थ महादेव लोहान (२४, सर्व रा. मुळा रस्ता, खडकी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस उपनिरीक्षक अर्जुन बेंदगुडे यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मुळा रस्त्यावरील त्यागी बंगला परिसरात २ जानेवारीला मध्यरात्री अडीचच्या सुमारास ध्वनिवर्धकावर गाणी लावून आरोपी नृत्य करत होते. कोणती गाणी ध्वनिवर्धकावर वाजवायची, या कारणावरून आरोपींमध्ये वाद सुरू होता. ध्वनिवर्धकाचा आवाज ऐकून गस्त घालणारे पोलिस उपनिरीक्षक अर्जुन बेंदगुडे, सहकारी पोलिस कर्मचारी जाधव तेथे गेले.
त्यांनी ध्वनिवर्धक बंद करा, असे सांगून कारवाई करण्यास सुरुवात केली. तेव्हा आरोपींनी अरेरावी सुरू केली. आम्ही कोण आहोत, याची माहिती तुम्हाला नाही. पोलिस आम्हाला काही करू शकणार नाहीत, असे सांगून आरोपींंनी उपनिरीक्षक बेंदगुडे आणि जाधव यांना धक्काबुक्की केली. पोलिसांच्या वाहनाची चावी काढून घेतली. शासकीय कामात अडथळा आणला तसेच धक्काबु्क्की केल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून पोलिस उपनिरीक्षक वैभव मगदूम तपास करत आहेत.