पुणे - कुलभुषण जाधव यांची कुटूंबियांना भेट नाकारण्यात येत होती. परंतु आंतरराष्ट्रीय दबाव वाढवून ही भेट घडवून आणायला भाग पाडले. यापुढे फाशी कायमची रद्द करून त्यांच्या सुटकेसाठी आम्ही आंतरराष्ट्रीय दबाव वाढवत आहोत. यामध्ये नक्कीच यश मिळेल, असे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी स्पष्ट केले. तसेच एल्फिन्स्टन पुलप्रकरणी राजकारण न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
पुण्यात एका कार्यक्रमानंतर डॉ. भामरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पाकिस्तान सरकारने कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी त्यांच्या पत्नीला नुकतीच परवानगी दिली आहे. यावर बोलताना भामरे म्हणाले, कुलभूषण जाधवप्रकरणी आपण पाकिस्तानला उघडे पाडण्यात यशस्वी झालो. लष्करी न्यायालयाने ज्या प्रकारे त्यांना फाशीची शिक्षा सुनावली, या प्रक्रियेचाच विरोध आणि निषेध करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय न्यायालयातही त्यांना उघडे पाडले. म्हणून त्यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती मिळाली. इतक्या दिवस त्यांची भेटही नाकारण्यात येत होती. पण आंतरराष्ट्रीय दबाव वाढविला. आता त्यांच्या सुटकेसाठी आंतरराष्ट्रीय दबाव वाढविला जात आहे.लष्कराकडून मुंबईतील एल्फिन्स्टन रेल्वे पुल उभारला जाणार आहे. यावर झालेल्या टिकेला प्रत्युत्तर देताना भामरे यांनी याचे राजकारण न करण्याचे आवाहन केले. एल्फिन्स्टन पुलाची उभारणी ३१ जानेवारीपर्यंत केली जाईल. येत्या काही दिवसात त्याचे काम सुरू होईल.
ही दुर्घटना सगळयांठी दुखद घटना होती. त्यामुळे लवकरात लवकर हा पुर्ण करण्याची जबाबदारी लष्कराला देण्यात आली आहे. याचा मला अभिमान आहे. लष्कर केवळ सिमेचेच रक्षण करत नाही. भुकंप, पुर यांसह विविध आपत्कालीन घटनांमध्ये लष्कर मदत करते. हा लष्कराच्या कामाचाच भाग आहे. या दुर्घटनेचे गांभीर्य पाहिले तर हा एक चांगला निर्णय आहे. त्यावर कृपया कोणी राजकारण करू नये, असे भामरे यांनी सांगितले.
विमानतळाचा प्रश्नच लवकरच सोडवूपुरंदर विमानतळाचा सुरक्षेबाबतचा अहवाल लष्कराकडे आहे. याबाबत लष्कराकडून अद्याप मान्यता मिळालेली नाही. याविषयी बोलताना भामरे म्हणाले, याबाबत पुण्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि मुख्यमंत्री यांनी माझ्याशी चर्चा केली आहे. मंत्रालयात बैठकही झाली आहे. सर्व प्रश्न सोडवून त्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील.