पुणे:मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम गतीने सुरू असले तरी शहरातील वाहतुकीची समस्या लक्षात घेता मेट्रोच्या सर्व विस्तारीत मार्गांच्या प्रकल्प अहवालाचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी खासदार गिरीश बापट यांनी लोकसभेत केली. शहरातील एकूण ८ मार्गांचे तब्बल ८२ किलोमीटरचे प्रस्ताव असून या विस्तारीत मार्गाची सुरुवात होणेही गरजेचे असल्याचे बापट यांनी लोकसभेत सांगितले.
वनाज ते चांदणी चौक (१.५ किमी), रामवाडी ते वाघोली (१२ किमी), हडपसर ते खराडी (५ किमी.), स्वारगेट ते हडपसर (७ किमी), खडकवासला ते स्वारगेट (१३ किमी) आणि एसएनडीटी ते वारजे (८ किमी) तसेच पीसीएमसी ते निगडी ४.४१ किमी आणि स्वारगेट ते कात्रज ५.४६ अशा एकूण ८२.५ किलोमीटरच्या मेट्रो मार्गांचा प्रस्ताव आहे. त्यापैकी पीसीएमसी ते निगडी ४.४१ किमी आणि स्वारगेट ते कात्रज ५.४६ किलो मीटरचा सर्वेक्षण अहवाल केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. खासदार बापट यांनी हाच विषय उपस्थित करून या विस्तारीत मेट्रो मार्गांचे प्रकल्प अहवालाचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी करणारा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला.
पुणे आणि त्याभोवतालच्या परिसराचे वेगाने शहरीकरण होत आहे. त्यामुळे पायभूत सुविधांवर ताण येत आहे. प्रामुख्याने वाहतुकीची समस्या तयार झाली आहे. त्यामुळेच पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे काम जलद गतीने सुरू करण्याची गरज आहे. यातून वाहतूक कोंडीची चिंताजनक परिस्थिती कमी करण्यासाठी मदत होईल, असे मत बापट यांनी व्यक्त केले.