पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास आराखड्याची मुदत संपत आली असून, महापालिकेने तातडीने आराखडा तयार करण्याचे काम हाती घ्यावे, अशा सूचना करण्यात आल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी फडणवीस यांनी विधानभवन येथे बैठक घेतली. या बैठकीस शहरातील आमदर, महापालिकेचे पदाधिकारी तसेच अधिकारी उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २२ प्रलंबित प्रश्नांवर या वेळी चर्चा करण्यात आली. त्यात शहरासाठीच्या नदीसुधार योजनांबरोबरच पिंपरी-चिंचवड शहरातील लष्काराच्या रेड झोन तसेच लष्कराच्या हद्दीतील रस्त्याबाबत चर्चा करण्यात आल्याचे फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, आमदार लक्ष्मण जगताप, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले उपस्थित होते. फडणवीस म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरात सांडपाण्याची विशेष व्यवस्था नाही. तसेच ते वाहून नेण्यासाठी वाहिन्यांचे जाळे नसल्याने महापालिकेने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कमी क्षमतेने चालत आहेत. त्यामुळे शहरातून जाणाऱ्या नद्या मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन राज्यशासनाने शहरासाठी सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांचे जाळे टाकण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी महापालिकेकडून करण्यात आली होती. त्यानुसार केंद्रशासनाच्या अमृत योजनेतून या योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय शहरातील अनेक रस्ते तसेच मोठा भाग लष्कराच्या हद्दीत असल्याने अनेक समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी चर्चा करण्यात आली असून, त्यांनी त्या सोडविण्यास मान्यता दिली आहे. तसेच उर्वरित प्रश्नांबाबत ते पुण्यात उद्या (शनिवारी) बैठक घेणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. याशिवाय दोन्ही पालिकांची पीएमपी ही समान वाहतूक व्यवस्था असल्याने पुणे शहर स्मार्ट सिटी होताना सार्वजनिक वाहतुकीसाठी आयटी बॅकबोन तयार केला जात असताना पिंपरीनेही ही यंत्रणा उभारावी, अशा सूचना देण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले.
पिंपरी-चिंचवडचा डीपी सादर करा
By admin | Published: May 14, 2016 12:36 AM