पुणे: महापालिकेला शनिवार, रविवार व सोमवारी (दि.११,१२,१३ मे) सलग सुट्ट्या आल्याने अनेक जण बाहेर गावी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या खात्यातील मतदान केलेल्या कर्मचाऱ्यांचा अहवाल १६ मे पर्यंत महापालिकेच्या विभाग प्रमुखांनी सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी याबाबतचे आदेश सर्व विभाग प्रमुखांना दिले आहेत. पुणे, शिरूर व मावळ या तीन लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी उद्या (दि.१३) मतदान होत आहे. त्यामुळे महापालिकेला आज सुट्टी देण्यात आली आहे. मात्र सलग सुट्ट्यांमुळे महापालिकेचे कर्मचारी बाहेर गावी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर आयुक्त भोसले यांनी हे आदेश दिले आहेत.
दरम्यान महापालिकेला सुट्टी असली तरी, महापालिकेच्या अत्यावश्यक सेवा आजही सुरू राहणार आहेत. तर या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या विभागांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपला मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी दोन तासाची सुट्टी देण्यात येणार असल्याचेही आयुक्त भोसले यांनी जाहिर केले आहे.