पुणे : शहरात २४ तास पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या ८५ नवीन पाणी टाक्यांची निविदा प्रक्रिया कशी राबविण्यात आली, त्यामध्ये कंपनीला किती दराने काम देण्यात आले, स्पर्धक कंपन्यांचे दर काय होते, आदी सविस्तर माहिती देणारा अहवाल महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी शासनाला सादर केला. त्यामुळे शासनाकडून या निविदा प्रक्रियेच्या चौकशीला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी ३ हजार कोटी रुपयांची योजना आखण्यात आली आहे. याअंतर्गत शहरात नवीन ८५ पाण्याच्या टाक्या बांधण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, या टाक्यांच्या निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार आमदार अनिल भोसले, अनंत गाडगीळ यांनी विधान परिषदेमध्ये केली होती. या पार्श्वभूमीवर चौकशी करण्याचे व तोपर्यंत कामाला स्थगिती देण्याचे आदेश राज्य शासनाने गेल्या आठवड्यात दिले आहेत.पाण्याच्या ८५ टाक्या बांधण्यासाठी सुरुवातीला ६ स्वतंत्र निविदा काढण्यात आल्या होता. मात्र, टाक्या बांधण्याचे काम स्वतंत्र ६ कंपन्यांकडून घेण्याऐवजी एकाच कंपनीला दिल्यास कमी खर्चामध्ये हे काम होऊ शकेल, असे निदर्शनास आल्याने सुरुवातीची निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली. त्यानंतर सर्व ८५ टाक्या बांधण्याच्या कामाची एकच निविदा काढण्यात आल्याचे आयुक्तांनी पाठविलेल्या अहवालामध्ये स्पष्ट केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.एका विशिष्ट कंपनीला हे टेंडर मिळावे यासाठी सुरुवातीची निविदा प्रक्रिया रद्द करण्याचा आरोप आमदार अनिल भोसले यांनी केला आहे. आयुक्तांच्या अहवालात आता शासन पातळीवर या निविदा प्रक्रियांची चौकशी करण्यात येणार आहे. आमदारांनी केलेले आरोप व आयुक्तांनी दिलेले स्पष्टीकरण याची तपासणी चौकशीमध्ये केली जाणार आहे. पाण्याच्या टाक्यांचे काम सुरू करण्यास विलंब झाल्यास त्याचा परिणाम २४ तास पाणीपुरवठा योजना रखडण्यावर होणार आहे. त्यामुळे चौकशी प्रक्रिया लवकर मार्गी लागून कामावरची स्थगिती उठवावी, यासाठी महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.
निविदा प्रक्रियेचा अहवाल शासनाला सादर
By admin | Published: March 20, 2017 4:42 AM