मुंबई - अभिनेता सुबोध भावे सध्या त्याच्या नवीन मालिकेमुळे चर्चेत आहे. बस बाई बस या मालिकेच्या भागासाठी त्याने खासदार सुप्रिया सुळे यांना निमंत्रित केले होते. त्यामुळे, मनोरंजनाच्या व्यासपीठावर राजकीय किस्सेही चर्चेत आले. त्यातच, सुबोधने सध्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवरही स्पष्टपणे मत व्यक्त केलं आहे. सहजा चित्रपटसृष्टीतले कलाकार स्पष्टपणे राजकीय भाष्य करत नाहीत. मात्र, सुबोधच्या या परखडपणाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. विशेष म्हणजे, एका कार्यक्रमात बोलताना सुबोध राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानाचाही समाचार घेतला.
पुण्यातील 'डेक्कन एज्युकेशन सोसायटी'च्या 'डीईएस प्री-प्रायमरी स्कूल'तर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त 'शतसूर्याचे तेज' या लोकमान्यांच्या जीवनकार्याचा वेध घेणाऱ्या नृत्य-नाटिकेचे आयोजन करण्यात आले होते. लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिधी दिनी झालेल्या या कार्यक्रमाला अभिनेता सुबोध भावे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होता. त्यावेळी, बोलताना त्याने परखडपणे सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.
आपण सर्वजण चांगल्या नोकरीच्या शोधात आहोत, चांगले शिक्षण घेऊन चांगल्या पगाराची नोकरी करण्यासाठी, विदेशात जाण्यासाठी आपली धडपड दिसत आहे. मात्र, याच अजाणिवेतून आपण लायकी नसणाऱ्यांच्या हातात देश दिला आहे, अशा शब्दात सुबोधने आपलं मत मांडलं. तसेच, राजकारण्यांच्या हातात देश देऊन काहीही होणार नाही. ते काय करतात, हे आपल्या समोर आहेच. म्हणूनच पुढच्या पिढीमध्ये राष्ट्रीय शिक्षणाची बीजे रोवून त्यांना देशासाठी उभे करणे गरजेचे आहे. इंग्रजांनी नोकरदार तयार व्हावेत, यासाठी आपल्या देशात शिक्षण व्यवस्था आणली. आजही आपण तीच व्यवस्था पाळत आहोत. म्हणूनच 'मुंबई, महाराष्ट्रातून काही लोक निघून गेले, तर पैसेच राहणार नाहीत', अशी वक्तव्ये करण्यास काही राजकारणी धजावतात, असे म्हणत सुबोधने राज्यपाल कोश्यारींनाही अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं.
दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या विधानाबद्दल माफी मागितली आहे. तसेच, माझा कुठलाही हेतू नव्हता, तरीही मी दिलगिरी व्यक्त करतो, असे कोश्यारी यांनी एका निवेदनातून म्हटले आहे.