पुणे : युट्युब चॅनेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चांगला परतावा मिळवा असे सांगून महिलेची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याबाबत आंबेगाव परिसरात राहणाऱ्या एका ३६ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टेलिग्रामच्या माध्यमातून पुण्यातील आंबेगाव परिसरात राहणाऱ्या एकाला अज्ञात व्यक्तीने संपर्क साधला. त्यानंतर युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करून तसेच लाईक करून पैसे कमवता येईल असे सांगत वेगवेगळे टास्क दिले. टास्क पूर्ण केल्यावर सुरुवातीला मोबदला देऊन महिलेचा विश्वास संपादन केला. त्यांनतर पैसे भर आणखी चांगला मोबदला मिळेल असे सांगून महिलेला १२ लाख ५ हजार रुपये गुंतवण्यास भाग पाडले. मात्र, कोणत्याही प्रकारचा परतावा न देता सदर रकमेची फसवणूक करत ऑनलाइन गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तक्रारदार महिलेने अज्ञात मोबाईल क्रमांक धारक तसेच टेलिग्राम युजर आणि विविध बँक खातेधारक यांच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड पुढील तपास करत आहे.