पुणे : गणपती मंडळांवर यंदा राजकीय ‘सहकार्या’चा पाऊस असल्याने कार्यकर्ते वर्गणीसाठी दारोदार फिरत असल्याचे चित्र फारसे दिसत नाही. आपापल्या भागातील इच्छुकांकडून मंडळांनी मूर्तींना दागिने करवून घेण्यापासून रोख देणग्या घेऊन उत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे. सामान्य मतदारांना यंदा महिनाअखेर असूनही गणरायांचे आगमन सुखदायक वाटत असून, एका कुटुंबाचा वेगवेगळ्या मंडळांना वर्गणी देण्याचा त्रास टळला आहे.विधानसभा निवडणूक रंगात आलेली असताना गणेशोत्सव साजरा होत आहे. शहर व जिल्ह्यात शेकडो गणेशोत्सव मंडळे असून, या मंडळांना उत्सव साजरा करण्यासाठी लागणारी वर्गणी सामान्य नागरिकांकडून घेतली जाते. एकेका वस्तीत किंंवा सोसायटीत येऊन चार ते पाच मंडळे वर्गणी जमा करीत असल्याचे चित्र पुण्यात असते. अशा मंडळांची किमान वर्गणीची गरज भागवावी लागत असल्याने नागरिकांवर वर्गणीसाठी जमणारा कार्यकर्त्यांचा ताफा हे जणू आर्थिक संकट असते.या पार्श्वभूमीवर विद्यमान आमदारांपासून इच्छुकांपर्यंत अनेकांचे सहकार्य मंडळांना लाभत आहे. काही लाखांमध्ये राजकीय मंडळी देणग्या देत असल्याने वर्गणीसाठी पायपीट करण्याऐवजी राजकीय मंडळीकडे जाऊन कमी श्रमात अधिक निधी जमा करण्याची संधी मंडळांच्या कार्यकर्त्यांना आहे.काही गणेशोत्सव मंडळे कंपन्यांच्या, संस्थांच्या जाहिरात कमानी उभारून उत्सव प्रायोजित स्वरूपात साजरा करतात. घरोघर जाऊन वर्गणी गोळा करण्याचे प्रमाण काहीसे घटले आहे. तथापि, दरवर्षी नवनवीन मंडळे उदयास येत असल्याने त्यांच्या वर्गणीचा भुर्दंड सामान्य नागरिकांनाच पडत होता. त्या पार्श्वभूमीवर महिनाअखेरीस आलेला गणेशोत्सव यंदा सुखकर्ता ठरला आहे. (प्रतिनिधी)
राजकीय देणग्यांमुळे वाचतेय वर्गणी
By admin | Published: August 29, 2014 4:35 AM