-----
बाकीच्यांना बियाणांच्या लक्षांकावर लाभ : प्रतीक्षायादीला प्राधान्य
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: अनुदानित बियाणांसाठी जिल्ह्यातून अर्ज केलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली. एकूण ३५२७ अर्जांपैकी फक्त ६३० जणांना लॉटरी लागली. आता शिल्लक राहिलेल्यांना बियाणांच्या लक्षांकावर प्रतीक्षायादीतील क्रमांकानुसार लाभ मिळेल.
अनुदानित बियाणांसाठी राज्यभरात ६ लाख ४३ हजार अशा विक्रमी संख्येने अर्ज आले. पुणे जिल्ह्यातून मात्र फक्त ३५२७ जणांनीच अर्ज केले. त्यातही भातपिकासाठी ९ तालुक्यांमधून ५२७, सोयाबीनसाठी ५ तालुक्यांतून ८२८ असे सर्वाधिक अर्ज आहेत. अन्य अर्ज बाजरी, तूर, उडीद अशा पिकांसाठी आहेत.
यातील ६३० अर्जदार लॉटरीतून निश्चित झाले. भात, सोयाबीनची मागणी करणारे त्यात जास्त आहेत.
लॉटरीत फक्त ६३० जण निश्चित झाले असले तरी जिल्ह्याला मिळालेल्या अनुदानित बियाणांचा लक्षांक (उपलब्धता) त्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे लॉटरीनंतर शिल्लक राहिलेल्या अर्जदारांना लाभ देण्याच्या सूचना सरकारने जिल्हा कृषी खात्याला दिल्या आहेत. प्रतीक्षायादीतील क्रमांकांनुसार नावे निश्चित करण्याचे काम जिल्हा कृषी विभागात सुरू आहे.
नियमाप्रमाणे किमान २ हेक्टरपर्यंतच अनुदानित बियाणांचा लाभ देण्यात येतो. त्यातही बियाणांच्या उपलब्धता, अर्जदारांची संख्या यावर किती वाटप करायचे ते निश्चित होते. सोयाबीन बियाणे एका हेक्टरला ७५ किलो लागते व त्यांची किंमतही बरीच असते. त्यामुळे त्याचा लक्षांक जास्त अर्जदारांमध्ये विभागला जातो. ---//
आदेश जारी
जिल्ह्यासाठीचे अनुदानित बियाणांचे पुरवठा आदेश काढले आहेत. लक्षांकांनूुसार प्रतीक्षायादीतील क्रमांकांप्रमाणे लाभार्थी निश्चित करून त्यांना संदेश पाठवण्याची व्यवस्था होते आहे.
ज्ञानेश्वर बोटे- जिल्हा कृषी अधीक्षक
-----
जिल्ह्यातील एकूण अर्ज: ३५२७
लॉटरीतील अर्ज- ६३०
लाभ मिळणार असलेले अर्ज- सुमारे १७८४
--------
जिल्ह्याचा बियाणेनिहाय अर्ज व लक्षांक
सोयाबीन- ८२८/ ४२८ क्विंटल
भात- ५२७/ २३०
तूर- १००/ ६
उडीद- ७६/ ४
बाजरी- २५३/ १०५
--------
वाट पाहत आहे.
अजूनतरी काहीच संदेश मिळालेला नाही. सोयाबीनसाठी अर्ज केला आहे. पेरण्या सुरू व्हायच्या आधी बियाणे मिळावे
उत्तमराव डोके, शेतकरी, जुन्नर
----///
नियम अटीच जास्त
सरकारी योजना आहे, त्यामुळे उशीर होणार याची खात्री आहे. सोयाबीन महाग असते. ते मिळाले तर तेवढाच खर्च कमी होतो.
धुंडीराज थोरात- शेतकरी.
---//