वारजे : लाखो रुपये खर्चून व अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर बांधण्यात आलेला कर्वेनगर येथील भुयारी मार्गाचा नागरिकांना उपयोग होण्यापेक्षा तो अडचणीचा ठरत आहे. या भुयारी मार्गात अंधार व दुर्गंधीचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात काही प्रमाणात पाणी झिरपून गळती होत असल्याने तसेच येथील जिन्यात कडेला रेलिंग नसल्याने ज्येष्ठांसह नागरिकांनादेखील यातून चालणे जिकिरीचे झाले आहे.कर्वेनगर मुख्य चौकातील रहदारी दिवसेंदिवस वाढत आहे. या भागातील शाळा-महाविद्यालये व इतर कार्यालर्यांमुळे सकाळ-संध्याकाळ या रस्त्यावर वाहनांची प्रचंड गर्दी होत असते. अशातच मागील तीन वर्षांपासून या चौकातच नवीन उड्डाणपूल निर्मितीचे काम चालू आहे. त्यामुळे चौकात वाहनांच्या भाऊगर्दीत वाट काढण्यापेक्षा नागरिक व विद्यार्थी रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्गास पसंती देतात. पण सध्या पावसाचे दिवस असल्याने भुयारी मार्गात काही प्रमाणात पाणी झिरपून ते साचून राहते. याशिवाय या ठिकाणी लघुशंका केल्याने दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. मोठ्या दिमाखात उद्घाटन झालेल्या भुयारी मार्गात संध्याकाळच्या वेळी अंधार पडतो. त्यामुळेही विद्यार्थी, महिला व ज्येष्ठांना या ठिकाणी चालण्यात अडचण होत आहे. या ठिकाणची ही दुरवस्था पाहता लवकरात लवकर दुरुस्ती व स्वच्छता करण्यात यावी तसेच पुरेशी प्रकाश व्यवस्था असावी, अशी मागणी विजय खळदकर, गौरव खैरनार, विकास उभे व विजय मोरे आदी स्थानिक नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)
भुयारी मार्ग दुरुस्तीची मागणी
By admin | Published: August 05, 2015 3:01 AM