पुणे : मेट्रोचे रस्त्यावरचे काम गतीने सुरू असले, तरी या कामात खरे आव्हान ‘शिवाजीनगर ते स्वारगेट’ या भुयारी मार्गाचे आहे. भुयारी मार्गासाठी लागणारा दोन्ही बाजूंचा उतार करण्याच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली असून, ठेकेदार निश्चित होताच याही कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. मेट्रोचा तब्बल ५ किलोमीटरचा मार्ग भुयारी आहे. जमिनीखाली तो साधारणपणे ३० मीटरइतका खोल असेल. या मार्गावर एकूण ५ स्थानके आहेत. तीही अर्थातच भुयारी असतील व रस्त्यावर जमिनीतून वर निघतील. प्रवाशांना स्थानकातून वर यावे लागेल व त्यानंतर त्यांना रस्त्याने अन्य वाहनाने प्रवास करता येईल. सर्व म्हणजे ५ ही स्थानकांवर ही व्यवस्था करण्यात आली असून, वर येण्यासाठी सरकते जिने व लिफ्टही असेल.मेट्रोच्या या भुयारी मार्गाचे वैशिष्ट्य म्हणजे, तो संपूर्णपणे शहराच्या मध्यभागातून जातो आहे. कृषी महाविद्यालयाच्या थोडे पुढे मेट्रो खाली जमिनीलगत येईल. त्यानंतर ती शिवाजीनगरच्या थोडे अलीकडे असलेल्या बोगद्यात ती शिरेल. हा बोगदा सुरुवातीला १० मीटर खोलीवर असेल. तो नंतर ३० मीटरपर्यंत खोल जाईल. त्याच्या मध्यभागातून मेट्रो धावेल. मार्गाच्या मध्यभागापासून पुढे बोगद्यातच मेट्रो हळूहळू वर येऊ लागेल. स्वारगेट येथे मेट्रोचे स्थानक आहे व तेही जमिनीखालीच असणार आहे. स्वारगेटपासून कात्रजपर्यंत विस्तारित मेट्रो मार्गाची प्राथमिक पाहणी सुरू आहे. ते काम मंजुरीच्या अंतिम टप्प्यात गेले की, स्वारगेटपर्यंत आलेली मेट्रो तिथून वर काढावी लागेल किंवा भुयारी करण्याचा निर्णय झाला तर तशीच पुढे न्यावी लागेल.रस्त्यावर असलेल्या उंच खांबांच्या वरून धावणारी मेट्रो बोगद्यात मात्र बोगद्याच्या जमिनीलगतच धावणार आहे. सध्या खांबांवर मेट्रो मार्गाची जी रचना आहे तशी रचना बोगद्यात जमिनीवर असेल व त्यावरूनच मेट्रो धावेल. असा बोगदा तयार करण्यासाठी म्हणून जी यंत्र लागतात त्यांचे कर्टस बोगद्याच्याच आकाराचे असतात. ते थेट त्याच व्यासाचा वर्तुळाकार तुकडा काढत पुढे पुढे जातात. त्यातून निघालेला राडारोडा सगळा यंत्राच्या आतच जमा करण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे इतके मोठे खोदकाम होऊनही रस्त्यावर त्याचा कचरा होणार नाही.दोन मार्गखांबांवर असलेला मेट्रो मार्ग साडेआठ मीटर रुंदीचा आहे. त्यात प्रत्येकी साडेतीन मीटर रुंदीचे दोन मेट्रो मार्ग (अप अॅण्ड डाऊन) आहेत. मध्ये थोडी व कडेला थोडी, अशी वॉकिंग डिस्टन्सची जादा देखभाल- दुरुस्तीसाठी आहे. प्लॅटफॉर्म वगळता अन्य संपूर्ण मार्ग बंदिस्त असेल. प्लॅटफॉर्म जवळची जागा मोकळी असेल. मेट्रो थांबली की प्रवाशांना तिथून थेट स्थानकात व स्थानकातून मेट्रोत येता येईल.1मेट्रोचा भुयारी मार्ग कृषी महाविद्यालयापासून सुरू होईल. तिथून शिवाजीनगर म्हणजे, सिव्हिल कोर्टापर्यंत उतार असेल, तिथून ती नदी क्रॉस करेल व पुढे कसबा पेठेनजीक जलनि:सारण केंद्र आहे तिथे येईल. तिथून बुधवार पेठ, मंडई यामार्गे स्वारगेटकडे जाईल. हा संपूर्ण मार्ग जमिनीखाली ३० मीटर असेल. त्यामुळेच वरच्या भागाला मेट्रोचा काहीही त्रास होणार नाही; मात्र भुयारी स्थानकातील प्रवासी जिथून रस्त्यावर येतील, त्या भागात पादचारी प्रवाशांची कोंडी होण्याची शक्यता आहे. या प्रवाशांना लगेचच अन्य वाहने उपलब्ध होतील.2भुयारी मार्ग करताना एकूण ४ यंत्रांचा वापर करण्यात येणार आहे. दोन यंत्रे शिवाजीनगरच्या बाजूने व दोन स्वारगेटच्या बाजूने एकाचवेळी बोगदा तयार करण्याचे काम सुरू करतील. चारही यंत्रे बुधवार पेठ येथील एका जागेतून वर काढण्याचा अभियंत्यांच्या प्रयत्न आहे. त्या दृष्टीने रचना करण्यात येत आहे. स्थानक असेल अशाच ठिकाणाहून ती वर काढण्यात येणार आहे. त्यासाठी महामेट्रो कंपनी जागेच्या शोधात असून, एका खासगी जागेच्या मालकाशी अधिकाऱ्यांचा संपर्क झाला असल्याची माहिती मिळाली.
पुणे मेट्रोचा भुयारी मार्ग ३० मीटर खोल, ५ किलोमीटर लांब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 3:48 AM