उरुळी कांचन (पुणे) : लोणी काळभोर - पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्ग ६५ वरील उरळी कांचन, थेऊर फाटा आणि लोणी काळभोर येथे अंडरपास (VUP) बांधण्याच्या कामाला भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मंजुरी दिली असून, सातत्याने अपघात होणारी जंक्शन्स सुरक्षित करण्याच्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यामुळे यश आले आहे.
पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अलीकडच्या काळात सातत्याने अपघात होत आहेत. या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला होता. या असंतोषाची दखल घेऊन खासदार डॉ. कोल्हे यांनी हडपसर ते उरळी कांचन दरम्यान एलिव्हेटेड रस्ता बांधण्याची मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. मात्र, त्यासाठी बराच विलंब लागणार असल्याने खासदार डॉ. कोल्हे यांनी किमान महत्त्वाची जंक्शन्स सुरक्षित करण्याची सूचना केली होती.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या सूचनेची दखल घेऊन उरळी कांचन (कि. मी.२८/९१०), लोणी (कि. मी. १७/५००) आणि थेऊर फाटा (कि. मी. २०/२८०) याठिकाणी अंडरपास बांधण्याच्या कामाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहनचालकांचा प्रवास सुरक्षित होईल. त्याचबरोबर स्थानिक नागरिक, पादचारी यांनाही सुरक्षितता मिळेल.
यासंदर्भात खासदार डॉ. कोल्हे यांनी सा़ंगितले की, नागरिकांची व वाहनचालकांची सुरक्षितता हा प्राधान्याचा विषय असून, या तीनही अंडरपासमुळे अपघातांवर नियंत्रण येऊ शकेल. आता हे तीनही अंडरपास लवकर व्हावेत, यासाठी माझा पाठपुरावा सुरूच राहणार आहे, असेही डॉ. कोल्हे यांनी सांगितले.