पुणे : फिरायला जाण्याचे बुकिंग करून देतो सांगून बँक खात्यातून लुटलेले साडेचार लाख रूपये परत करण्यात मार्केटयार्ड पोलीस ठाण्यातील सायबर पथकाला यश आले आहे. बिबवेवाडी परिसरात राहण्याऱ्या पियुष जामगांवकर (४८, रा. बिबवेवाडी) यांना काही अज्ञात व्यक्तींनी संपर्क साधून जगन्नाथ पुरीला जाण्यासाठी कमी पैश्यांमध्ये बुकिंग करून देण्याचे आश्वासन दिले.
बुकिंगचे पैसे आधी भरावे लागतील असे सांगून जामगांवकर यांच्याकडून क्रेडिट कार्ड क्रमांक आणि ओटीपी घेत जामगांवकर यांच्या बँकेच्या खात्यावरून ४ लाख ६१ हजार रुपये परस्पर ट्रान्स्फर करून घेतले होते. क्रेडिटकार्डमधून व्यवहार झाल्याचा संदेश येताच त्यांनी तत्काळ मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे आणि अश्विनी पाटील यांना याप्रकरणी तत्काळ तपास करण्याच्या सूचना केल्या. संबंधित अधिकाऱ्याशी संवाद साधून क्रेडिटकार्डमधून गेलेले ४ लाख ५० हजार रुपये तंत्रज्ञानाच्या मदतीने व्यवहार माघारी फिरवण्याचे सांगितले. त्यामुळे जामगांवकर यांच्या क्रेडिटकार्डमधून व्यवहार झालेली रक्कम त्यांना परत मिळाली.
सायबर गुन्ह्यांमध्ये फसवणूक झाल्यानंतर लवकरात लवकर सायबर पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पैसे वाचवणे शक्य होते. पूर्वी सायबर गुन्ह्यांमध्ये बँकेची पडताळणी व अहवाल येईपर्यंत गुन्हा दाखल होण्यातच आठवड्याचा कालावधी लागायचा. त्याचा फायदा घेऊन आरोपी खात्यातील रक्कम काढायचे. पोलिसांच्या हेल्पलाईनवर संपर्क केल्यास तात्काळ फसवणुकीची रक्कम गोठवणे शक्य आहे. याशिवाय स्थानिक पोलीस ठाण्यात तात्काळ तक्रार केल्यास फसवणुकीचे पैसे वाचवणे शक्य होते.
- स्वप्नाली शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मार्केटयार्ड पोलीस ठाणे