विमाननगर : ‘‘जीवनात अनेक चढ-उतार येतात. त्यांच्यावर मात करतच मार्ग शोधावा लागतो. अपयशाने खचून न जाता प्रामाणिक प्रयत्न सातत्याने करीत राहिल्यास हमखास यश मिळते,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री हेमामालिनी यांनी केले. सिम्बायोसिस व फिक्की फ्लो यांच्या वतीने आयोजित दोनदिवसीय शब्दोत्सव महोत्सवात ‘बी अॅन्ड द ड्रीमगर्ल’ या त्यांच्या आत्मचरित्रात्माक पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच या वेळी या पुस्तकावर परिसंवाद आयोजिला होता. या वेळी लेखक राजकमल मुखर्जी उपस्थित होते. शंतनू चौधरी यांनी हेमामालिनी व राजकमल मुखर्जी यांच्याशी संवाद साधला. आत्मचरित्राची निर्मिती व त्याच्या जीवनातील अभिनयक्षेत्रातील प्रवास याबाबत हेमामालिनी व राजकमल यांनी माहिती दिली. परिसंवादाची सुरुवात हेमामालिनी यांच्या जीवनावर आधारित एका ध्वनिचित्रफितीने करण्यात आली. त्यांची अभिनय क्षेत्रातील सुरुवात, गाजलेले चित्रपट, भूमिका, पुरस्कार यांसह राजकीय क्षेत्रातील प्रवास याचा त्यामध्ये समावेश होता. या वेळी हेमामालिनी यांनी त्यांच्या अभिनयक्षेत्रातील सुरुवात कशी झाली, याबद्दल माहिती दिली.
लेखक राजकमल मुखर्जी म्हणाले, हेमामालिनी कोणत्याही कामात शंभर टक्के योगदान देते. ती कोणालाही फसवत नाही. तिचे स्वतंत्र अस्तित्व ती टिकवून आहे. ती खऱ्या अर्थाने ड्रीमगर्ल आहे. या वेळी हेमामालिनी यांनी त्यांच्या अभिनय व राजकीय क्षेत्रातील अनुभव कथन केले. सध्याचे आघाडीचे ‘पद्मावत’ व ‘रझिया सुलतान’ या चित्रपटाच्या भूमिका व बजेट यावरदेखील चर्चा झाली. परिसंवादाचा हेमामालिनी यांनी त्यांच्या ‘गोपालो का समर्पण’ या नवीन भक्तिगीतांच्या अल्बममधील गीताच्या ओळी गाऊन समारोप केला.
पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर केलेला अभिनय अत्यंत वाईट होता. त्या वेळी खूप काही ऐकून घ्यावे लागले; मात्र त्यातूनच शिकायला मिळाले. पुढे जाऊन राजकपूर यांच्या ‘सपनों का सौदागर’ चित्रपटासाठी स्क्रीन टेस्ट दिली. त्यात राज कपूर यांना मी केलेला अभिनय खूप आवडला. तू नक्कीच मोठी अभिनेत्री होशील, असा आशीर्वाद त्यांनी मला दिला. पुढे अनेक चित्रपटांत संधी मिळाली. कुंटुबातील भक्कम मदतीनेच माझ्या अभिनय व राजकारण दोन्ही क्षेत्रांतील प्रवास यशस्वीपणे पूर्ण करू शकल्याचे नमूद केले.
- हेमामालिनी, ज्येष्ठ अभिनेत्री