लोणी काळभोर : कामावर जाणेसाठी पुणे-सोलापूर महामार्गावरील सेवा रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्तीला कोयत्याचा धाक दाखवून लाकडी दांडक्याने मारहाण करून पैसे लुटणाऱ्या एकास जिल्हा ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.
याप्रकरणी गणेश ऊर्फ आबा मधुकर माने (वय १९, रा. मोरेवस्ती, कोरेगाव मूळ, ता. हवेली) याला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर वसंत सावंत (वय २९, रा. सोरतापवाडी, खटाटेवस्ती, ता. हवेली) हे भोसरी पुणे येथील कंपनीमध्ये नोकरीस आहे. कंपनीमध्ये जाण्या-येण्यासाठी कंपनीची बस आहे. शुक्रवारी (दि. १२) सकाळी ४-४५ वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी म्हसोबा मंदिराचे समोर सोलापूर-पुणे महामार्गालगत कंपनीचे बसची वाट पाहत थांबले होते. सकाळी ५ वाजण्याच्या सुमारांस एक दुचाकी मोटार उरूळी कांचन बाजूकडून आली. त्या गाडीवर तीन इसम बसलेले होते. ते सावंत यांचेपासून थोडे पुढे जाऊन थांबले. त्या गाडीवरील अंगाने सडपातळ, अंदाजे २५ ते ३० वयोगटातील दोन इसम हे पायी चालत आले. त्यापैकी एकाचे हातात लाकडी दांडके होते व दुसऱ्याच्या हातात लोखंडी कोयता होता. त्यातील दांडके हातात असलेल्या मुलाने सावंत यांचे उजव्या पायाचे पोटरीवर दांडके मारले व तुझ्याजवळ जे काही असेल ते पटकन काढून दे असे म्हणाला. मारहाण करतील म्हणून सावंत यांनी खिशातील वस्तू काढल्या. त्यामध्ये दोन हजार रूपये रोख रक्कम, दोन बँकेचे एटीएम कार्ड, आधार कार्ड, कंपनीचे आयकार्ड होते. ते दोघे त्याचे सोबत असणारे इसमाकडे गेले व ते तिघे दुचाकीवरून पुणे बाजूकडे निघून गेले. घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, राम धोंडगे, पोलीस हवालदार उमाकांत कुंजीर, राजू मोमीन, धीरज जाधव, दगडू वीरकर यांच्या पथकाला एका बातमीदाराकडून गणेश माने हा त्या ठिकाणी गाडी चालवत होता व त्याच्याकडे लाल रंगाची दुचाकी आहे, अशी माहिती मिळाली. माने याला ताब्यात घेतले व अधिक चौकशी केली असता, गणेश माने व त्याच्या दोन साथीदारांनी गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.