आळंदी: आषाढी वारीसाठी शासनाने वाखरी ते ईसबावी येथील विसावा मंदिरपर्यंतचे तीन किमी अंतर सर्व मानाच्या पालख्यांच्या चाळीस वारकऱ्यांना पायी वारीसाठी परवानगी दिली आहे. मात्र सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक असणार आहे. राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन, मुदत व पूनर्वसन विभागाचे कक्ष अधिकारी हितेंद्र फुफारे यांनी तसा सुधारित आदेश दिला आहे. त्यामुळे देवस्थानच्या मागणीला अखेर यश आले आहे.
आळंदीतून जेष्ठ वद्य अष्टमीला शुक्रवारी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पंढरीकडे प्रस्थान होईल. शासनाच्या निर्देशानुसार आळंदीत माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी शंभर वारकऱ्यांव्यतिरिक्त साडे तीनशे वारकऱ्यांना दर्शनासाठी मंदिरात सोडण्यात येणार आहे. देहू येथे जगतगूरू संत तुकाराम महाराज प्रस्थान सोहळ्यामध्ये शंभर वारकऱयांव्यतीरिक्त अडीचशे वारकऱ्यांना दर्शनासाठी शासनाने परवानगी दिली आहे.
विसावा मंदिरापासून पुढे पंढरपूरापर्यंत साडे अंतर सर्व पालखी सोहळ्याचे एकत्रित मिळून केवळ २० वारकरी पायी जातील
आषाढ शुद्ध दशमी अर्थातच १९ जुलैला सर्व पालख्या एसटीने पंढरीला मार्गस्थ होऊन वाखरी येथे पोहतील. वाखरीत गेल्यानंतर मात्र मानाच्या पालख्यांना परंपरेनुसार चालण्याची परवानगीसाठी सर्व देवस्थान आग्रही होते. त्यानुसार शासनाने वाखरी ते ईसबावी येथील विसावा मंदिरपर्यंतचे तीन किमी अंतर सर्व मानाच्या पालख्यांच्या चाळीस वारकऱ्यांना पायी वारीसाठी परवानगी दिली आहे. तर ईसबावी येथील विसावा मंदिरापासून पुढे पंढरपूरापर्यंत साडे तीन किमीचे अंतर सर्व पालखी सोहळ्याचे एकत्रीत मिळून केवळ २० वारकरी पायी जातील.
आषाढी वारीसाठी वाखरी येथे आलेल्या सर्व मानाच्या दहा पालखी सोहळ्यातील उर्वरित सहभागी ३८० वारकरी इसबावीपासून थेट वाहनाने पंढरपूरात विसाव्यासाठी पोचतील. पंढरपूरात जाताना मात्र सर्वांनी मानाच्या क्रमाने आणि सामाजिक अंतर ठेवूनच मार्गक्रमण करावयाचे असल्याचे नवीन आदेशात नमूद करण्यात आले आहे.