पुणे - तीन वर्षांच्या मुलाच्या श्वसननलिकेत अडकलेली सीताफळाची बी तर १५ वर्षीय मुलाच्या नाकात सहा वर्षांपूर्वी लाकडाचा तुकडा काढण्यात ससून रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे.पहिल्या घटनेमध्ये शिक्रापूर येथील एका तीन वर्षांच्या मुलाच्या श्वसननलिकेत सीताफळाची बी अडकली होती. तीन दिवसांपूर्वी सीताफळ खाल्ल्यानंतर त्याला अचानक खोकला सुरू झाला. ग्रामीण रुग्णालयात उपचार घेऊनही हा खोकला कमी झाला नाही. त्यामुळे त्याला ससून रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याच्या उजव्या फुप्फुसामध्ये श्वास कमी पोहोचत असल्याने श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर छातीची क्ष-किरण तपासणी करण्यात आली, तेव्हा श्वसननलिकेत काही तरी अडकल्याचे दिसले. रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने ब्रान्कोस्पोपी करून नलिकेत अडकलेली सीताफळाची बी बाहेर काढली. या पथकामध्ये कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ. समीर जोशी, डॉ. संजय सोनावले, डॉ. अपूर्व वर्मा, डॉ. रूपाली बोरकर, डॉ. कीर्ती कुंडलवाल यांचा समावेश होता.दुसऱ्या घटनेत मूळच्या नेपाळमधील १५ वर्षीय सूरज सावंत या मुलाच्या नाकात सहा वर्षांपूर्वी लाकडाचा तुकडा अडकला होता. तो झाडावरून खाली पडल्याने लाकडाचा तुकडा डाव्या डोळ्याला छेद देऊन त्याच्या नाकात अडकला. स्थानिक रुग्णालयात डोळ्यातील तुकडा काढला. पण सहा वर्षे उपचार घेऊनही त्याचा त्रास कमी झाला नाही. ससून रुग्णालयात आल्यानंतर त्याच्या नाकाचे सीटी स्कॅन केले. त्यामध्ये ८ सेंटिमीटर लांबीचा लाकडाचा तुकडा नाकात अडकल्याचे निदर्शनास आले. तो शस्त्रक्रिया करून काढण्यात आला. अधिष्ठाताडॉ. चंदनवाले यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. समीर जोशी, डॉ. राहुल ठाकूर, डॉ. गुनित कौर, डॉ. गायत्री तडवळकर, डॉ. प्राजक्ता तायडे यांच्या पथकाने शस्त्रक्रियेत सहभाग घेतला.
श्वसननलिकेत अडकलेली सीताफळाची बी काढण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 1:08 AM