लोणावळा : लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी पडलेल्या तोफा गडावर घेऊन जाण्यात मावळ तालुक्यातील शिवप्रेमी संघटनांच्या शिलेदारांना यश आले. रविवार व सोमवार दोन दिवस विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत लोहगडाच्या पायथ्याजवळ पडलेल्या ३ तोफा गडावर चढविल्या. यापूर्वी ३ तोफा गडावर चढविण्यात आल्या आहेत.छत्रपती शिवरायांच्या पावनस्पर्शाने पुनीत झालेल्या मावळ प्रांतातील गड-किल्ले हे मराठ्याच्या इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभे आहेत. या गड-किल्ल्यांचे संवर्धन व रक्षण करण्यासाठी विविध शिवप्रेमी संघटना कार्य करत आहेत. मागील काही दिवसांपासून गड संवर्धनाचे काम करणारी दुर्गविजय मावळ यांना लोहगडाच्या पायथ्याजवळ तीन तोफा मिळून आल्या होत्या. रविवारी व सोमवारी दुर्गविजय मावळ, सह्याद्रीचे शिलेदार, मावळ अँडव्हेंचर टीम, अनुशासन गडकिल्ले सुरक्षादल, श्री शिवशंभू प्रतिष्ठान, सह्याद्री प्रतिष्ठान व मावळ प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थांनी सदर तोफा गडावर चढविल्या. भारतीय पुरातत्त्व विभागाने परवानगी दिल्यास दोन्ही गडावर सुरक्षिततेच्या दृष्टीने कामे करण्याचा मानस या वेळी दुर्गप्रेमी व शिवप्रेमी संघटनांनी व्यक्त केली. तसेच गड-किल्ले परिसरात येणाऱ्या पर्यटकांनी गड-किल्ल्यांचे पावित्र्य जपत किल्ले परिसरात स्वच्छता राखावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मावळ तालुक्यातील किल्ले सुरक्षित राहावेत, यासाठी सुरक्षा व्यवस्था पुरविण्याचे काम करण्याची तयारी त्यांनी दशिर्विली आहे. (वार्ताहर)
तोफा गडावर चढविण्यात शिवप्रेमी संघटनांना यश
By admin | Published: January 11, 2017 2:53 AM