१ जुलै २०२१ रोजी ‘स्वच्छंद’ला ५ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त हिमाचल प्रदेशच्या स्पिती व्हॅलीतील खामेंगर या दुर्गम भागातील शिखरावर मोहीम आयोजित करण्यात आली होती. यासाठी अनिकेत कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली ३ गिर्यारोहकांच्या संघाची निवड करण्यात आली. कोरोनामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीतही या मोहिमेसाठी उत्तम शारीरिक, मानसिक व तांत्रिक तयारी करत संघ मोहिमेसाठी सज्ज झाला. स्वच्छंदच्या अनेक हितचिंतकांनी मोहिमेचा आर्थिक भार पेलला.
३ जुलैला संघ पुण्याहून मनालीमार्गे स्पिती व्हँलीकडे रवाना झाला. या खेड्यातून दोन दिवसांचा ट्रेक करून चोम लेकजवळ संघाने बेस कँप लावला. त्यापुढे संघाने ॲडव्हान्स बेस कॅम्प व कॅम्प १ लावत ५,५२६ मीटरवरील समिट कॅम्प गाठला. १६ जुलैला पहाटे २:३० वाजता उणे तापमानात संघाने शिखरमाथ्याकडे प्रस्थान केले. वाटेतील १०० फूट उंचीची बर्फाळ भिंत, व २०० मीटरचा अवघड टप्पा पार करत सकाळी संघाला शिखरमाथा गाठण्यात यश आले.
शिखरमाथ्यावरून रतांग टॉवर, शिग्री पर्वत, खंग शिलिंग, दिबिबोक्री पिरॅमिड अशी हिमाचल प्रदेशातील उत्तुंग शिखरांचे दर्शन झाले. परतताना थकवणारा भुसभुशीत बर्फ आणि कॅम्प १ व ॲडव्हान्स कॅम्पमधील ओढा पार करत संघ सुखरूप बेस कॅम्पला परतला. या मोहिमेला हिमाचल प्रदेशातील 'माउंटन एक्सपीडिशन’ या संस्थेची मदत झाली. संघाबरोबरच संस्थेच्या चंदी ठाकूर, इंद्र देव ठाकूर आणि राज कृष्ण या सहकाऱ्यांनीही शिखारमाथा गाठला.
या अनामिक शिखरावर ही पहिलीच चढाई असल्यामुळे शिखराचे नामकरण करण्याची संधी स्वच्छंदला मिळणार आहे. या संदर्भातील सविस्तर अहवाल आणि प्रस्तावित नाव भारतीय गिर्यारोहण संस्थेकडे पाठवण्यात येणार आहे.
___________
खामेंगर व्हॅली हा दुर्गम भाग असून या भागाची अतिशय अल्प माहिती होती. या शिखरावर ही प्रथमच चढाई असल्यामुळे मोहिमेच्या परिणामांबाबत अनिश्चितता होती. त्याचबरोबर काेरोना निर्बंधांमुळे पूर्वतयारीस पुरेसा वेळ मिळाला नाही. तरीही संघाने शिखरमाथा गाठल्यामुळे खूप आनंद झाला.
- अनिकेत कुलकर्णी, मोहिमेचा नेता.
-----------------------------------
स्वच्छंद ॲडवेंचर फाऊंडेशनच्या गिर्यारोहक संघाने केलेली कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे. नवीन, माहिती नसलेल्या शिखरावर चढाई करून त्यांनी नवोदितांसाठी आदर्श घालून दिला आहे.
- उमेश झिरपे, ज्येष्ठ गिर्यारोहक
फोटो - स्पिती व्हँली