इंदापूर : इंदापूर नगर परिषदेच्या दिवाबत्ती व पाणीपुरवठा विभागाच्या थकीत वीज बिलाबाबत माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखालील इंदापूर नगर परिषदेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी (दि.२३) ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी केलेली चर्चा यशस्वी ठरली आहे, अशी माहिती नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी दिली.अंकिता शहा म्हणाल्या की, इंदापूर नगर परिषदेच्या ४ कोटी ९६ लाख ९ हजार ९१० रूपयांच्या थकबाकीची व्याज व दंडाची रक्कम माफ करुन इतर रक्कम समान हप्ते करून भरणेचा निर्णय झाला. पाणीपुरवठा विभागासाठी आवश्यक असणारा नवीन वीज जोड ताबडतोब जोडून देण्याचे आदेश बावनकुळे यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार शुक्रवारपासून काम ही सुरु झाले आहे.आज (दि.२५) थकबाकीपोटी महावितरणला १० लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. थोड्याच दिवसांत शहरातील काही भागात जिथे कमी दाबाने पाणीपुरवठा सुरु होता, तिथे जास्त दाबाने पाणी मिळेल. आजपासून शहरातील पथदिवे नियमीतपणे सुरू होतील. पथदिवे बंद असल्याच्या काळात शहरवासियांनी संयम दाखवला, नगर परिषदेस सहकार्य केले, असे त्या म्हणाल्या.
थकीत वीजबिलाबाबत ऊर्जामंत्र्यांशी यशस्वी चर्चा
By admin | Published: March 26, 2017 1:22 AM