मुंबई: अवघ्या एक महिन्याच्या लहानग्या बाळाने जन्मजात हृदयविकार व कोविड-१९ अशा दोन महाप्रचंड आव्हानांवर यशस्वीपणे मात केल्याची घटना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये नुकतीच घडली आहे.
नंदुरबार येथील कृष्णा अगरवाल यांच्या एक महिन्याच्या मुलीच्या हृदयात गंभीर बिघाड असल्याने या हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. ती कोविड पॉझिटिव्ह असल्याने प्रथम त्यावर उपचार करून दोन आठवड्यांनंतर शस्त्रक्रिया करण्यात आली.
रुग्णालयाचे चिल्ड्रेन्स हार्ट सेंटरचे संचालक डॉ. सुरेश राव यांनी सांगितले, "मुलीचे वजन फक्त तीन किलो होते. ऑक्सिजन सॅच्युरेशन ८६% होते. जन्मजात हृदयविकार असल्याचे आढळून आले होते. तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते."
डॉ. तनुजा कारंडे यांनी सांगितले, संसर्गजन्य आजार तज्ञ डॉ. तनु सिंघल आणि इतर टीम सदस्यांसोबत विचारविनिमय केल्यानंतर बाळाला कोविड आयसीयूमध्ये ठेवले. मुलीची आईला देखील कोविड पॉझिटिव्ह असल्याने आयसोलेट करण्यात आले. त्यानंतर करेक्टिव्ह ओपन हार्ट सर्जरी करून शस्त्रक्रिया करण्यात आली.
रुग्णालयातील याच टीमने अशाच प्रकारच्या आणखी दोन कोविड पॉझिटिव्ह बाळांवर उपचार करण्यात यश मिळविले आहे.
बाळाचे वडील कृष्णा अगरवाल यांनी सांगितले की, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी माझ्या मुलीचे प्राण वाचविले.