पिंपरी :यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात १५ वर्षीय मुलीवर स्वादुपिंड या ग्रंथीशी संबंधित कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अतिशय गुंतागुंतीची व जोखमीची ही शस्त्रक्रिया होती. त्यामुळे तब्बल पाच तास शस्त्रक्रिया चालली. व रुग्ण शस्त्रक्रियेतून सुखरूप बाहेर आला आहे.
पोटात दुखणे, मळमळ होणे, वारंवार उलट्या ही लक्षणे दिसल्यामुळे रुग्णाला ८ एप्रिलला वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. भूक मंदावल्याने रुग्णांचे वजन कमी होऊ लागले होते. सुरुवातीला पोटातील लहान आकाराची असलेली गाठ लगेच वाढून मोठ्या आकाराची झाली. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णांच्या पोटाचा सिटी स्कॅन आणि एमआरसिपी करण्यात आला. त्यामध्ये रुग्णांच्या पोटात १०×१४×१४ सेंटीमीटर आकाराचा स्वादुपिंडाचा कर्करोग असल्याचे दिसून आले. डॉक्टरांनी इतर तपासण्याकरून करून शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. ही शस्त्रक्रिया गुंतागुंतीची व जठील स्वरूपाची असल्याचे शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ. संतोष थोरात यांनी सांगितले. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांना डॉक्टरांनी संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली. त्यानंतर १२ एप्रिलला ही शस्त्रक्रिया करण्यात आली. तर २४ एप्रिलला सकाळी रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला असून, प्रकृती व्यवस्थित असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
स्वादुपिंडाशी संबंधित कर्करोग हे अत्यंत वेगाने वाढणारे असतात. वेळीच योग्य निदान व योग्य ती शस्त्रक्रिया केल्यास अशा रोगांमध्ये चांगले परिणाम बघायला मिळतात असे वायसीएम पदव्युत्तर संस्थेचे शल्यचिकित्साशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. संतोष थोरात यांनी सांगितले. रुग्णांचे हित लक्षात घेता रुग्णालयात कोरोना काळात सुद्धा तातडीच्या शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. असे वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी सांगितले. ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्याकरिता डॉ. बालाजी धायगुडे, डॉ. मारोती गायकवाड, डॉ. आनंद झिंगाडे, डॉ. मनीषा सपाटे, डॉ. कांचन वायकुळे, डॉ. हर्षद गावडे, डॉ. आशिष यादव, डॉ. राजीव बिळासकर, डॉ. पृथ्वी पटेल यांनी परिश्रम घेतले.