विलास शेटे, मंचरतावरणात झालेला बदल तसेच पावसाचे जास्त प्रमाण असूनही थोरांदळे (ता. आंबेगाव) येथे भालचंद्र नथू विश्वासराव व कल्पना भालचंद्र विश्वासराव या दाम्पत्याने दोन एकर क्षेत्रात बटाटे पिकाचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. बटाटापीक जोमदार आले आहे. २० क्विंटल लागवडीला १८ ते २० टन उत्पादन अपेक्षित आहे. शेतकरी विश्वासराव यांच्या शेतातील बटाटापिकाची पाहणी करण्यासाठी परिसरातील शेतकरी भेट देत आहेत.वातावरणातील बदलांमुळे मागील वर्षी बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला होता. अक्षरश: भांडवल अंगावर आले होते. असे असतानाही भालचंद्र विश्वासराव यांनी थोरांदळे येथे बटाटापीक यशस्वीपणे घेतले आहे. शेतातील बटाटापीक सर्वांचे लक्ष वेधून घेते. बटाटापीक यशस्वीपणे येण्याची कारणे सांगताना विश्वासराव म्हणाले, ‘‘बटाटे लावण्याअगोदर जमीन मशागत टॅक्टरने करून उभेआडवे फणून घेतले व नंतर त्यामध्ये दोन मोठे टेम्पो कोंबडखत टाकून ते मजुरांकडून चांगल्या प्रकारे सर्व शेतामध्ये पसरवले. त्यानंतर टॅक्टरच्या साह्याने संपूर्ण शेत रोटावेटरने पुन्हा एकदा मशागत करून घेतले. त्याचा फायदा असा झाला, की संपूर्ण कोंबडखत जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे मिसळले गेले. तद्नंतर मंचर बाजार समितीतून संजय मोरे यांजकडून भुल्लर व समृद्धी मार्काचे बटाटा बियाणे २० क्विंटल आणले. ते दोन दिवस घरी खाली ओतून ठेवले. त्यावर बुरशीनाशकाचा स्प्रे मारला. ते सुकल्यानंतर पुन्हा गोणीमध्ये भरून ठेवले, त्याचा फायदा अंकुर चांगले निघून निर्जंतुंक झाले. त्यानंतर लागवडीच्या दिवशी २ एकराला एक गोणी १०:२६:२६ व ३ गोणी १०:५:१० अशा ५० किलो वजनाच्या गोणी असे रासायनिक खत एकत्र करून संपूर्ण शेतात टाकून घेतले. त्यानंतर टॅक्ट्ररने बटाटा लागवड यंत्राच्या साह्याने बटाटा बेड पद्धतीने लागवड केली. त्यामुळे वेळ व खर्चाची बचत झाली व लागवड काही तासांतच उरकली.
दोन एकरांत घेतले बटाट्याचे यशस्वी उत्पादन
By admin | Published: October 24, 2016 1:11 AM