अवसरी : मेंगडेवाडी (ता. आंबेगाव) येथील तरुणांनी एकत्र येऊन मुक्तादेवी मंदिराजवळ असलेल्या गण्या डोंगराजवळ १२०० वड, पिंपळ, चिंच, आवळा, आंबा, बेल, उंबर, फणस इत्यादी प्रकारची रोपे लावली आहेत. ही झाडे जगविण्यासाठी मेंगडेवाडी, हिंगेवस्ती, वळसेमळा येथील तरुणांनी ३५० फूट उंचीवर पाणी घेऊन जाण्यासाठी लोकवर्गणीतून दोन पाण्याच्या टाक्या, पाईपलाईन आणि ठिबक साहित्याची खरेदी करून त्याद्वारे पाणीपुरवठा केला.
मुक्तादेवी मंदिरासाठी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य विवेक वळसे पाटील यांनी एक हायमास्ट दिवा, संपूर्ण लाईट व्यवस्था केली आहे. थोड्याच दिवसांत एक पत्राशेड मंजूर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
मेंगडेवाडी, हिंगेवस्ती व वळसेमळामधील तरुणांनी एकत्र येऊन वटवृक्ष मेंगडेवाडी, एक हरित चळवळ ही चळवळ उभी केली. कोरोना लॉकडाऊन काळात १ जुलै २०२० याची स्थापन करण्यात आली. त्यानुसार मेंगडेवाडी गावाचे वैभव असलेला ‘श्री गण्या डोंगर’ येथे पहिल्या वर्षी सुमारे १२०० वड, पिंपळ आणि चिंच अशी रोपे लावण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने फक्त देशी रोपे लावण्याचे ठरविण्यात आले. त्यामध्ये वड, पिंपळ, चिंच,कडुलिंब, आपटा, कांचनवेल, फणस, उंबर, बेल, आवळा, जांभूळ, कवठ, आंबा, अर्जुन आणि रिठा अशा विविध प्रकारची जास्त प्रमाणात प्राणवायू देणारी देशी रोपे लावण्यात आली.
झाडांना पाणीपुरवठा नियमित व्हावा यासाठी ठिबक सिंचन उभा करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यासाठी लागणारा खर्च लोकवर्गणीतून जमा करण्यासाठी देणगी जमा करण्यास सुरवात केली. त्यामध्ये श्री गणेश देवस्थान ट्रस्ट मेंगडेवाडी यांच्याकडून पाण्याचा पंप देण्यात आला. इतर निधीतून पाण्याच्या टाक्या, पाईपलाइन व ठिबक साहित्य घेण्यात आले. पहिल्या वर्षी सुमारे ९५० झाडांना ठिबक करण्यात आले. सुमारे ९५० झाडांचे संवर्धन करण्यात ग्रूपला यश आले.नागरिकांच्या वाढदिवस, आठवण, लग्नाचा वाढदिवस तसेच कुणाच्या स्मरणार्थ मदत स्वीकारून त्यातून वृक्षारोपण केले जात आहे.
--
फोटो क्रमांक २७अवसरी वृक्षारोपण
फोटो : मेंगडेवाडी (ता. आंबेगाव) येथील गण्या डोंगराजवळ १२०० प्रकारच्या झाडांच्या लागवडीमुळे हिरवागार झालेला परिसर.