वेल्हे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे पहिले तोरण असणारा व चढाईसाठी प्रचंड अवघड असणारा असा हा अतिदुर्गम तोरणा किल्ला. तोरणा किल्ला सर करताना भल्या भल्यांची चांगलीच भंबेरी उडते. मग हा किल्ला जर दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर कुणी असामान्य तरुणांची पलटन सर करत असेल तर ती आश्चर्य व साहसाचे आगळेवेगळे उदाहरण नक्कीच ठरु शकते नां.. असाच अविस्मरणीय अनुभवाने तोरणागडावर ती नजरेपलिकडची पावले जेव्हा पडली तेव्हा झाला आत्मविश्वास आणि जल्लोष... ही साहसी कथी आहे..मुंबई, ठाणे, पनवेल,सातारा भागातून एकत्र येत आलेल्या दिव्यांग (दृष्टीहीन ) युवकांची... मुंबई येथील जिजाऊ प्रतिष्ठान च्या स्वयंसेवकांनी या अंध युवकांसाठी एक अनोखा ट्रेक आयोजित करून सृष्टी पाहू शकत नसलेल्यांना तोरणा गडावर नेऊन आनंद, निसर्ग, मेहनत, साहस अशा वैैविध्यपूर्ण छटांसह तोरणाच्या ऐतिहासिक भव्यतेचा अनुभव दिला. यामध्ये मोहिमेत २५ तरुण तर १५ तरुणी असे ४० अंध तरुण तरुणीं सहभागी झाले होते. या दिव्यांग युवक युवतींनीनिर्विघ्नपणे तोरणा गड सर करत सर्वांना आश्चयार्चा धक्का दिला आहे. मुंबई येथील जिजाऊ प्रतिष्ठान व नॅशनल असोशिएशन फॉर ब्लाइन्ड इंडिया या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने सदर ट्रेक चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ७५ ते १०० टक्के अंध युवक व युवती सहभागी झाले होते. सातारा, मुंबई, पनवेल, ठाणे आदी भागातून हे अंध युवक या अवघड ट्रेकसाठी एकत्र आले. मुसळधार पाउस..अतिदुर्गम तोरणागडाची कड्याकपारीतून जाणारी गडाची निसरडी पाऊलवाट..उंच कडे यामधून मार्ग काढत दुर्दम्य आकांक्षा बाळगणाऱ्या या अंध युवकांनी तोरणा किल्ला सर करून एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. या दरम्यान प्रतिष्ठान चे चंद्रकांत सातम यांनी या विद्यार्थ्यांना गडावरील झुंजार माची, बुधलामाची, कोकण दरवाजा, बिनी दरवाजा, मेंगाई टाके, आदी ऐतिहासिक स्थळांची माहिती दिली. डोळ्यांना दिसत नसतानाही या युवकांनी आपल्या ज्ञानचक्षुमधून तोरणा गड अनुभवला. वेल्ह्यातील गोटू गाडे यांनी सर्वांचे स्वागत केले. जिजाऊ प्रतिष्ठान मुंबई येथील विनायक वैद्य, गणेश रघुवीर, सुरेश देवकर, हेमंत पाठक, विवेक देशपांडे, स्वप्नाली वाळके, आदी स्वयंसेवकांनी यासाठी प्रत्यक्ष मदत केली...............................अंध डोळ्यांनी अनुभवला तोरणागड डोळ्यांनी अंध असतानाही १६०० फूट उंचीवर जाऊन तोरणा गडाच्या भव्यतेचा यांनी अनुभव घेतला. दृष्टी नसताना स्पर्श आणि आंतर्दृष्टीतून या अंंध युवक युवतींनी गड अनुभवला. मुसळधार पावसातही निसरड्या रस्त्याने किल्ला यशस्वीपणे सर केला. गडाच्या पायथ्याशी आल्यावर तोरणागडाची प्रतिकृती दाखवली. कस्तुरी अंदर, श्वेता आगरवाल, निशा डिसुझा, सरिता पाटील, शनया लोखंडे, समिक्षा पाटील, ह्रुशी पाडळे, पियुष रानडे, रुद्र ढोकळे, प्रसाद वायाळ, देवेन सोनार, आदी युवक- युवतींनी यामधे सहभाग घेतला. जिजाऊ प्रतिष्ठान मुंबई येथील विनायक वैद्य, गणेश रघुवीर, सुरेश देवकर, हेमंत पाठक, विवेक देशपांडे, स्वप्नाली वाळके, आदी स्वयंसेवकांनी यासाठी प्रत्यक्ष मदत केली.